बेळगाव लाईव्ह: समाजात शिक्षणाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, शिक्षकांनी आपली जबाबदारी ओळखून कार्य केल्यास विद्यार्थी उत्तम नागरिक होऊ शकतात, असे जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांनी आवाहन केले.
जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, उप संचालक कार्यालय शालेय शिक्षण विभाग आणि क्षेत्रीय शिक्षणाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी शहरातील कुमार गंधर्व रंगमंदिरात झालेल्या जिल्हा स्तरीय शिक्षक दिन तसेच जिल्हा व बेलगाव शहर विभागीय प्रतिभा कारंजी व कलोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन करताना ते बोलत होते.
शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनामुळे विद्यार्थी चांगले नागरिक बनून विविध क्षेत्रात प्रगती करू शकतात. विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य शिक्षकांच्या हातात आहे. विद्यार्थी उत्तम नागरिक बनून देशाचे नाव जगभर पोहोचवू शकतात तसेच त्यांच्या जीवनाला दिशा देण्याचे कार्य शिक्षकच करतात, असे ते म्हणाले.
सरकारी शाळेत शिकून अनेकांनी आज उंच पदे मिळविली आहेत. सावित्रीबाई फुले यांच्या धाडसामुळे आज महिलांना शिक्षण घेता येत आहे. बसवन्ना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या समाजसुधारकांचा इतिहास विद्यार्थ्यांना सांगून त्यांना चांगला नागरिक घडवावा, असेही त्यांनी सांगितले.






शिक्षकांनी दिलेले मार्गदर्शन विद्यार्थी मनात साठवून ठेवतात. त्यामुळे आजच्या शिक्षकांनी वर्गात केवळ अभ्यासक्रम शिकवण्याबरोबर मानवी मूल्ये व जीवनाचे धडे शिकवले पाहिजेत.
सरकारी शाळांच्या विकासासाठी शासनाकडून पुरेसे अनुदान दिले जात आहे. हे अनुदान योग्य रीतीने वापरून शाळांमध्ये चांगले वातावरण निर्माण करावे, असेही मंत्री जारकीहोळी म्हणाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार आसिफ सेठ होते. त्यांनी बोलताना निवृत्त शिक्षकांना वंदन करून सांगितले की, शिक्षणात शिकविण्यात येणाऱ्या विषयांना महत्त्व द्यावे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना जीवन घडविण्याचा मार्ग दाखवावा. “आम्ही नेहमी शिक्षकांसोबत आहोत, तुमचे कार्य देश घडविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी अर्पण व्हावे,” असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाला बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे
, महापालिका आयुक्त शुभा बी., शालेय शिक्षण विभागाच्या उपसंचालिका लीलावती हिरेमठ, क्षेत्रीय शिक्षणाधिकारी रवी भजन्त्री, सरकारी कर्मचारी संघाचे जिल्हाध्यक्ष बसवराज रायव्वगोल यांच्यासह शिक्षक, विविध विभागांचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
याच प्रसंगी उत्कृष्ट शिक्षक व निवृत्त शिक्षकांचा जिल्हा प्रभारी मंत्री, आमदार व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.





