बेळगाव लाईव्ह :एसएससी तांत्रिक प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या हुक्केरी (जि. बेळगाव) तालुक्यातील बेळवी गावातील रोहित शिवनगौडा मगदूम याची भारतीय सैन्यात लेफ्टनंट पदी निवड झाली असून त्यामुळे बेळगावचे नांव उंचावले आहे.
बेळगावच्या केएलएस गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून (जीआयटी) संगणक विज्ञानात बीटेक पूर्ण करणारा रोहित 29 सप्टेंबर 2025 रोजी गया येथील ऑफिसर ट्रेनिंग अकादमी (ओटीए) मध्ये लष्करी प्रशिक्षण सुरू करण्यासाठी सामील होणार आहे.
रोहित शिवणगौडा मगदूम याचे सुरुवातीचे शिक्षण दिल्लीत झाले. त्यानंतर पुढे सहावी ते बारावीपर्यंतचे शिक्षण बेळगाव कॅन्टोन्मेंट येथील केंद्रीय विद्यालय क्रमांक 2 मध्ये घेतल्यानंतर त्याने जीआयटीमध्ये अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले.
कठीण एसएसबी मुलाखत आणि वैद्यकीय परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण झाल्यानंतर भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून सामील होणाऱ्या अभियांत्रिकी पदवीधरांसाठी एसएससी तांत्रिक प्रवेश हा एक मुख्य मार्ग आहे.
रोहित मगदूम याचे यश बेळगावसाठी अभिमानास्पद असून देशाची सेवा करण्याची आकांक्षा असलेल्या तरुणांसाठी प्रेरणा आहे.





