बेळगाव लाईव्ह :बेळगाव तालुक्यातील राजहंसगड – देसुर रस्त्याची मोठे खड्डे पडून अत्यंत दुर्दशा झाली असून खड्ड्यांमुळे अपघात प्रवण बनलेल्या या रस्त्याची युद्ध पातळीवर दुरुस्ती करून तो सुरक्षित करावा अशी जोरदार मागणी केली जात आहे.
राजहंसगड – देसुर रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यामुळे येथील नागरिक व वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. राजहंसगड गावच्या वेशीत असलेल्या ब्रिज जवळ पडलेला मोठा खड्डा तर अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे.
या खड्ड्यांमध्ये साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज वाहनधारकांना येत नसल्याने अपघात घडत आहेत. एक दुचाकी स्वार आज सकाळी या खड्ड्यात पडून जखमी झाला.
त्यामुळे बराच काळ या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. वाहनांची रांग लागून काही काळ गोंधळ निर्माण झाला होता.
अशा घटना दररोज या ठिकाणी घडत आहेत तरी जिल्हा प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन या रस्त्यासह परिसरातील सर्व रस्त्यांची त्वरेने दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी वाहनधारकातून होत आहे.


