बेळगाव लाईव्ह: बेळगाव जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी बेळगाव शहरातील जिल्हा औषध गोदामाला अचानक भेट देऊन तपासणी केली.
त्यांनी गोदामातील साठा आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची माहिती घेतली तसेच औषध व्यवस्थापन सॉफ्टवेअरबाबत संपूर्ण माहिती घेऊन पडताळणी केली. बेळगाव जिल्ह्यातील आरोग्य संस्थांना औषध पुरवठ्याबाबत माहिती घेऊन, आरोग्य संस्थांच्या मागणीनुसार पुरवठा होत आहे याची खात्री केली.
जिल्ह्यातील विविध आरोग्य संस्थांमधील रुग्णांची संख्या एकसमान नसल्याने, रुग्णसंख्येनुसार आणि आरोग्य संस्थांच्या गरजेनुसार औषधांचे वितरण करण्याचे निर्देश गोदामाच्या प्रभारी अधिकाऱ्यांना देण्यात आले. औषधांची मुदत संपण्यापूर्वी त्यावर लक्ष ठेवण्यास आणि मुदत संपलेल्या औषधांचे वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे उपाय योजण्यास सांगितले.
विविध आरोग्य संस्थांमध्ये स्थानिक पातळीवर खरेदी केलेल्या औषधांची नोंद ई-औषध सॉफ्टवेअरमध्ये काटेकोरपणे करण्याचेही त्यांनी निर्देश दिले.
यावेळी जिल्हा पंचायतीचे उपसचिव बसवराज अडवीमठ, बेळगाव जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आय. पी. गडद, जिल्हा औषध गोदामाचे प्रभारी शुभानंद सोंटक्की आणि गोदामातील कर्मचारी उपस्थित होते.




