बेळगाव लाईव्ह : मोबाईलच्या व्यसनापासून दूर राहून त्याचा उपयुक्त माहिती व ज्ञानासाठीच वापर करा. सोशल मीडिया आणि रिल्सच्या नादात किमती वेळ वाया न घालवता विशाल ध्येय ठेवून ते गाठण्यासाठी झपाटून प्रयत्न करा. प्रयत्नांना उशिरा सुरुवात केला तरी नियोजनबद्ध अभ्यास करून त्यामध्ये सातत्य ठेवा. असा मोलाचा सल्ला राज्यात नवव्या क्रमांकाने पीएसआय परीक्षा उत्तीर्ण झालेल्या डॉ श्रुती पाटील यांनी दिला.
खानापूर येथील मराठा मंडळ शिक्षण संस्था संचलित ताराराणी पदवी पूर्व महाविद्यालयात विद्यार्थिनींना स्पर्धा परीक्षांची माहिती व्हावी यासाठी आयोजित मुलाखतीत त्या बोलत होत्या. पत्रकार वासुदेव चौगुले यांनी त्यांची मुलाखत घेतली.
डॉ श्रुती पाटील म्हणाल्या, मातृभाषा मराठीचा सार्थ अभिमान आहे. पण देश आणि जगाची विविधता कळण्यासाठी इतरही भाषा शिकण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही भाषेचा द्वेष करू नका. वृत्तपत्रांचे नियमित वाचन करा. अभ्यासाव्यतिरिक्त वाचनाची सवय लावून घ्या. वाचलेले लिहून काढण्याची सवय बाळगल्यास अभ्यास दीर्घकाळ स्मरणात राहतो.
स्पर्धात्मक परीक्षांचे वातावरण प्राथमिक आणि माध्यमिक स्तरापासूनच निर्माण करायला हवे.
ज्यांच्या वाट्याला संघर्ष येतो त्यांच्याच हातून अद्भुत कार्य घडते. याची जाणीव ठेवून न्यूनगंड बाजूला सारा. असे आवाहन त्यांनी केले.
प्राचार्य अरविंद पाटील यांनी, ताराराणी महाविद्यालय विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासावर भर देत असल्याचे सांगून करिअरची वाट निवडण्यासाठी यशवंतांच्या मुलाखती व भेटींचे आयोजन केले जात असल्याचे सांगितले. संचालक शिवाजी पाटील व मान्यवरांच्या हस्ते डॉ. श्रुती पाटील तसेच त्यांचे वडील श्रीकांत व आई सुरेखा यांचा सत्कार करण्यात आला.
विद्यार्थिनींनी देखील प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. तासभर चाललेल्या मुलाखतीने विद्यार्थिनींना स्पर्धा परीक्षांचे तंत्र व तयारी याविषयीची सखोल माहिती मिळाली. प्रा. टी. आर. जाधव यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला प्रा. एन. ए. पाटील, ताराराणी हायस्कूलचे मुख्याध्यापक राहुल जाधव, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होत्य
मेहनतीला पर्याय नाही
ध्येयहीन जीवन अर्थहीन ठरते. त्यामुळे आत्ताच आयुष्यात काय करायचे आहे ते निश्चित करा. त्यासाठी वाट्टेल ते कष्ट घेण्याची तयारी ठेवा. संघर्ष करण्याच्या काळात स्वस्थ बसू नका. तुमच्या यशाने आई-वडिलांची स्वप्नपूर्ती होणार आहे. त्यासाठी चिकाटी आणि कठोर मेहनतीला पर्याय नाही. असे डॉ. पाटील यांनी सांगितले.




