बेळगाव लाईव्ह : परवाना रद्द झालेल्या ‘जय किसान’ या खाजगी भाजी मार्केटची इमारत पाडण्याच्या मागणीसाठी आज शेतकरी संघटनांनी बेळगाव महापालिकेसमोर तीव्र आंदोलन केले.
मार्केटचा परवाना आणि इमारतीची परवानगी रद्द होऊनही महापालिकेने अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही, यावर शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. जोपर्यंत ही इमारत पाडली जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
यावेळी शेतकरी नेते चूनप्पा पुजारी यांनी म्हटले की, ‘जय किसान’ खाजगी भाजी मार्केटचा परवाना रद्द झाला आहे. तसेच, इमारतीची परवानगीही रद्द झाली आहे, परंतु त्याची नोटीस अद्याप बजावण्यात आलेली नाही. कोणत्याही दबावाखाली न येता महापालिकेने ही इमारत त्वरित पाडून टाकावी.

कर्नाटक शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते किशन नंदी यांनी नाराजी व्यक्त केली. “महापालिका आयुक्त आपले कर्तव्य विसरले आहेत. त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठीच आज शेतकऱ्यांनी हे आंदोलन केले आहे. ‘जय किसान’ खाजगी भाजी मार्केटची परवानगी रद्द झालेली असतानाही, महापालिका आयुक्त कोणाच्या दबावामुळे ती लागू करत नाहीत, हे कळत नाही.
महापालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्त या खाजगी भाजी मार्केटच्या इमारतीवर बुलडोझर चालवून ती जमीनदोस्त करेपर्यंत आमचा संघर्ष अविरत सुरू राहील,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.




