बेळगाव लाईव्ह :टिळकवाडी येथील पहिले रेल्वे गेट पैकी सध्या एका गेटच्या स्वयंचलित यंत्रणेत बिघाड होऊन ते बंद पडल्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून सदर गेट युद्धपातळीवर दुरुस्त करण्याची जोरदार मागणी केली जात आहे.
टिळकवाडी येथील पहिले रेल्वे गेटपैकी सध्या एका गेटच्या स्वयंचलित (ॲटोमॅटिक) यंत्रणेत बिघाड होऊन ते बंद पडले आहे. त्यामुळे गेटमनला एका बाजूचे गेट तात्पुरत्या पाईपच्या सहाय्याने बंद करावे लागत आहे. अलीकडे बेळगावातील रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण करण्यात आले आहे.
त्यामुळे टिळकवाडी येथील पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या रेल्वे गेटच्या ठिकाणी नेहमी दोन रेल्वे गाड्यांचे अल्पावधीत क्रॉसिंग होत असते. अशावेळी गेटच्या दोन्ही बाजूला वाहनांची मोठी गर्दी झालेली असते. रेल्वे गेल्यानंतर गेट केंव्हा उघडते आणि आपण केंव्हा मार्गस्थ होतो याची घाई प्रत्येक वाहन चालकाला झालेली असते. या पार्श्वभूमीवर सध्या पहिल्या रेल्वे गेट येथील एक गेट नादुरुस्त झाल्यामुळे धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे.

रेल्वे येण्याच्या वेळी कलामंदिर कॉम्प्लेक्सच्या बाजूच्या बंद पडलेल्या गेटच्या ठिकाणी वाहतूक थांबवण्यासाठी सध्या गेटमनला धावपळ करून पाईपच्या स्वरूपातील पर्यायी गेटचा वापर करावा लागत आहे. यामध्ये वेळ जात असल्यामुळे बंद होणारे दुसऱ्या बाजूचे ऑटोमॅटिक गेट ओलांडून पुढचे गेट ओलांडण्याच्या घाई असलेली वाहने आतल्या बाजूला अडकून पडत आहेत.
हा प्रकार दुतर्फा वाहतूक असणाऱ्या पहिल्या रेल्वे गेटच्या ठिकाणी दुर्घटनेला निमंत्रण देणारा ठरत आहे. तरी रेल्वे खात्याने याची गांभीर्याने दखल घेऊन टिळकवाडी पहिल्या रेल्वे गेट येथील बिघडलेले स्वयंचलित भेट तात्काळ दुरुस्त करावे अशी मागणी जागरूक वाहनचालकांकडून केली जात आहे.




