बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री सप्तशृंगी देवीचे दर्शन यंदा बेळगावकरांना घेता येणार आहे. कांगली गल्ली येथील एकता युवक मंडळाने शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने ही अनोखी संकल्पना साकारली आहे. हे मंडळ नवरात्रीदरम्यान दरवर्षी विविध वैशिष्ट्यपूर्ण देखावे आणि शोभायात्रेचे आयोजन करण्यासाठी प्रसिद्ध आहे.
महाराष्ट्रामध्ये साडेतीन शक्तीपीठे आहेत. कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी आणि नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंगी देवी ही तीन पूर्ण पीठे आहेत, तर माहूरची रेणुका देवी हे अर्धपीठ मानले जाते. यापैकी अंबाबाई आणि तुळजाभवानी देवीबद्दल बहुतेकांना माहिती आहे, पण सप्तशृंगी देवीबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. याच उद्देशाने, यंदा नवरात्रोत्सवात सप्तशृंगी देवीची भव्य प्रतिकृती साकारली जात आहे. यापूर्वी या मंडळाने कोल्हापूरच्या अंबाबाई, तुळजापूरच्या तुळजाभवानी आणि पंढरपूरचा देखावा देखील सादर केला आहे.
नवरात्रोत्सवाच्या तयारीला शहरात सुरुवात झाली असून, एकता युवक मंडळाने जोरदार तयारी केली आहे. सोमवार, २२ सप्टेंबर रोजी घटस्थापनेनंतर राणी चन्नम्मा चौकातून आगमन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात हत्ती, घोडे, पालखी आणि दाक्षिणात्य कलाकारांचा सहभाग असेल.
कांगली गल्लीचा हा आगळावेगळा नवरात्रोत्सव बेळगावात नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. या वर्षीच्या उत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे धर्मवीर संभाजी चौकात होणारी गंगा आरती. या आरतीसाठी खास करून वाराणसी, प्रयागराज आणि बनारस येथील काशी विद्यापीठात शिक्षण घेणारे विद्यार्थी येणार आहेत. वाराणसीतील गंगा घाटावर होणाऱ्या आरतीच्या धर्तीवर बेळगावातही हा अनुभव घेता येणार आहे.
ही गंगा आरती बेळगावकरांना रात्री ७ वाजता पाहता येणार असून, ती सुमारे पाऊण तास चालेल. धर्मवीर संभाजी महाराज चौकात आणि हेमू कलानी चौकात अशा दोन ठिकाणी ही गंगा आरती होणार आहे.
बेळगावकरांना यंदाहि नवरात्रोत्सवात केवळ धार्मिक अनुभवच नाही, तर कला आणि संस्कृतीचा अनोखा संगम अनुभवायला मिळणार आहे. गंगा आरतीचे खास आयोजन हे उत्सवाचे महत्त्व अधिक वाढवणार आहे.




