बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली असून, वातावरणात अचानक गारठा निर्माण झाला आहे. नवरात्री आणि साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या विजयादशमी सणाच्या तयारीसाठी बाजारात मोठी गर्दी असतानाच, आलेल्या या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.
गेल्या काही दिवसांपासून शहरात ऊन-पावसाचा खेळ सुरू होता. मात्र, आज शुक्रवारी सकाळपासून बेळगाव शहर आणि परिसरात ढगाळ वातावरणासह पावसाची रिपरिप सुरू आहे. या पावसामुळे शहर आणि उपनगरातील हवा कमालीची थंड झाली असून, हवेत गारठा निर्माण झाला आहे.
दुपारनंतर शहरासह तालुका परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली. दुपारपासून पावसाची संततधार कायम असल्याने अनेक सखल भागांत पाणी साचले, तसेच रस्त्यांवरही पाणी जमा झाले. या पावसामुळे मुख्य बाजारपेठेतील वर्दळ तत्काळ कमी झाली.
थंड हवेमुळे नागरिकांच्या अंगावर रेनकोट, जॅकेटसह ठेवणीतील उबदार कपडे दिसू लागले आहेत. बाहेरच्या थंड हवेमुळे सायंकाळी फिरायला बाहेर पडणाऱ्या नागरिकांपैकी वयस्कर मंडळींनी आज घरीच राहणे पसंत केले.
दसऱ्याच्या निमित्ताने खरेदीसाठी बाजारपेठेत आलेल्या नागरिकांची अचानक आलेल्या पावसामुळे त्रेधातिरपीट उडाली, तसेच रस्त्यावर तात्पुरते स्टॉल लावणाऱ्या विक्रेत्यांनाही आपले साहित्य गोळा करताना मोठी कसरत करावी लागली.
बेळगावमधील नवरात्रोत्सवाचे स्वरूप देखील बदलत असून ठिकठिकाणी भव्य प्रमाणात विविध प्रतिकृती साकारून, दुर्गादेवीच्या विविध स्वरूपातील मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. प्रतिकृती पाहण्यासाठी हळूहळू नागरिकांची गर्दी वाढत आहे. मात्र पावसाने अचानक हजेरी लावल्यामुळे नवरात्रोत्सव साजरा करणाऱ्या नागरिकांच्या आनंदावरही विरजण पडले आहे.
सध्याचे वातावरण सर्दी, खोकला, ताप यांसारख्या आजारांना निमंत्रण देणारे ठरत असल्यामुळे, शहरातील दवाखान्यांमध्ये मात्र रुग्णांची गर्दी वाढलेली दिसून येत आहे.




