बेळगाव लाईव्ह :बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील नागरी क्षेत्र महानगरपालिकेला हस्तांतरित करण्याबाबत खासदार शेट्टर यांनी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्याशी चर्चा केली.
नवी दिल्ली येथे केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेऊन, संरक्षण मंत्रालयाच्या आदेशानुसार बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील नागरी क्षेत्र निश्चित आले असून, हे जागा लवकरात लवकर बेळगाव महानगरपालिकेला हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेबाबत चर्चा झाली, असे बेळगाव लोकसभा खासदार आणि कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी सांगितले.
बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रात ओळखण्यात आलेले नागरी क्षेत्र आणि ते बेळगाव महानगरपालिकेला हस्तांतरित करण्याबाबतची सर्वसमावेशक माहिती यापूर्वीच कर्नाटक राज्याच्या मुख्य सचिवांनी नवी दिल्लीतील संरक्षण विभागाच्या सचिवांना भेटून सादर केली आहे. खासदारांनी केंद्रीय मंत्र्यांसमोर हा विषय उपस्थित करत, ही हस्तांतरण प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण होईल याची खात्री करण्याची विनंती केली.
पुढे, बेळगाव येथे संरक्षण साहित्य निर्मिती उद्योग स्थापन करण्यासाठी जमीन इत्यादी सुविधा उपलब्ध असल्याने या दृष्टीनेही विषयाचा विचार करण्याची विनंती करण्यात आली.
चर्चेनुसार, प्रस्तावित विषयांचा आढावा घेऊन लवकरात लवकर कारवाई करण्याचे आश्वासन केंद्रीय संरक्षणमंत्र्यांनी दिल्याचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभा खासदार जगदीश शेट्टर यांनी पत्रकात नमूद केले आहे.


