बेळगाव लाईव्ह :मराठी कागदपत्रे व फलकांचा मुद्दा बेळगाव महापालिकेच्या आगामी सर्वसाधारण बैठकीच्या विषय पत्रिकेवर घेण्याच्या आपल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समिती नगरसेवकांनी बैठकी दिवशी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे येत्या 25 सप्टेंबर रोजी होणारी महापालिकेची बैठक पुन्हा मराठीच्या मुद्द्यावर गाजण्याची शक्यता आहे.
बेळगाव महापालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत मराठी कागदपत्रे व फलकांचा मुद्दा चर्चेला घ्यावा अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नगरसेवक रवी साळुंके यांनी काल शुक्रवारी महापौर मंगेश पवार यांच्यासह महापालिकेतील सत्ताधारी गटाकडे केली आहे.
मात्र सत्ताधारी गटाकडून याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे आपल्या मागणीचा विषय चर्चेला घेतला नाही तर येत्या 25 सप्टेंबर रोजी म्हणजे सर्वसाधारण बैठकीच्या दिवशी सभागृहा ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय म. ए. समिती नगरसेवकांनी घेतला आहे.
सर्वसाधारण बैठकीच्या विषय पत्रिकेवर यावेळी लेखा परीक्षणातील 217 कोटी रुपयांच्या आक्षेपाचा मुद्दा प्राधान्याने घेण्यात आला आहे. सत्ताधारी गटनेते हणमंत कोंगाळे हा विषय बैठकीत उपस्थित करणार आहेत. याशिवाय गेल्या बैठकीत चर्चेला आलेला भूभाडे वसुलीचा विषय पुन्हा चर्चेला घेण्यात येणार असून विरोधी गटातील नगरसेवक अजीम पटवेगार हा विषय मांडणार आहेत.
गेल्या तीन बैठकांमध्ये विरोधी गटाचे नगरसेवक शाहिद खान पठाण यांच्याकडून महसूल विभागातील गैरकारभाराचा विषय उपस्थित केला जाणार होता, पण त्यांना संधी मिळाली नव्हती. त्यामुळे यावेळी तो विषय पुन्हा विषय पत्रिकेत घेण्यात आला आहे. रखडलेल्या 24 तास पाणी पुरवठा योजनेसंदर्भातील अपेक्षित असलेली चर्चा मागील बैठकीत झाली नाही.
हा विषय देखील सत्ताधारी गटनेते कोंगाळी 25 रोजीच्या सर्वसाधारण बैठकीत उपस्थित करणार आहेत. याखेरीज मागील बैठकीचे इतिवृत्त मंजूर करणे, स्थायी समितीचे इतिवृत्त मंजूर करणे, शहरातील वाहतूक व्यवस्थापन वगैरे अन्य विषय सर्वसाधारण बैठकीच्या विषयी पत्रिकेवर आहेत.
मराठी कागदपत्रे व फलकांच्या बाबतीतील नगरसेवक रवी साळुंके यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र एकीकरण समिती नगरसेवकांचा आक्रमक पवित्रा लक्षात घेता महापालिकेची आगामी सर्वसाधारण बैठक मराठीच्या मुद्द्यावर गाजण्याची शक्यता आहे.





