बेळगाव लाईव्ह ;राज्यामध्ये कर्नाटक सरकारच्या मागासवर्गीय आयोगातर्फे याच महिन्याच्या 22 तारखेपासून सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षण केले जात आहे. मराठा समाजाच्या हितासाठी या सर्वेक्षणामध्ये प्रत्येक समाज बांधवाने सहभागी होऊन नमुना फॉर्ममध्ये धर्माच्या कॉलममध्ये ‘हिंदू’, जातीच्या कॉलममध्ये ‘मराठा’, पोटजातीच्या कॉलममध्ये ‘कुणबी’ आणि मातृभाषेच्या कॉलममध्ये ‘मराठी’ अशी नोंदणी करावी, असे आवाहन मराठा समाजाचे नेते विधान परिषद सदस्य एम. जे. मुळे यांनी केले.
राज्यात सुरू होणाऱ्या जातीनिहाय जनगणतीच्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाज आणि क्षत्रिय मराठा परिषद बेळगावतर्फे शहरांमध्ये आज मंगळवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. विधान परिषद सदस्य मुळे म्हणाले की, कर्नाटक राज्यामध्ये कर्नाटक सरकारच्या मागासवर्गीय आयोगातर्फे याच महिन्याच्या 22 तारखेपासून पुढच्या 9 तारखेपर्यंत सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षण केले जात आहे. त्या सर्वेक्षणामध्ये सर्व आमचे समाज बांधव प्रत्येकाने सहभागी होऊन नोंदणी करावी त्याद्वारे आमची मराठा समाजाची संख्या माहित होणार आहे सरकारला देखील पुढे सवलती देणे सोयीचे पडते. त्यामुळे जातीनिहाय जनगणतीत नोंदणी करणे महत्त्वाचे आहे. या सर्वेक्षणात अंतर्गत नमुना फॉर्म मध्ये धर्माच्या कॉलम मध्ये हिंदू जातीच्या कॉलम मध्ये मराठा उपजातीच्या कॉलम मध्ये कुणबी आणि मातृभाषेच्या कॉलममध्ये मराठी असे समस्त मराठा बांधवांनी लिहावे अशी माझी विनंती आहे.
हे सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षण आहे. या सर्वेक्षणामुळे कोण किती अद्याप मागासलेले किंवा अधिक प्रगत आहे हे स्पष्ट होणार आहे. तथापि आपण चार कॉलम भरले म्हणजे झाले असे नाही तर एकूण 60 प्रश्न आहेत. सामाजिक प्रश्न अंतर्गत तुमचे लग्न कसे होते? पूजाअर्चा कशी होते? समाजामध्ये तुमचा दर्जा काय आहे? वगैरे गोष्टी पाहिल्या जातात. घराचे सर्वेक्षण केले जाते. घर कसे आहे? ते पत्र्याचे आहे, झोपडी आहे की सिमेंट काँक्रीटचे आहे? घरात नळ पाणी, शौचालय, वीज वगैरे मूलभूत नागरिक सुविधा आहेत का? सुशिक्षितता पडताळली जाते. प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन शिक्षण झाले आहे का? तुम्ही शहरी भागात की ग्रामीण भागात मोडता? आर्थिक बाजू तपासताना तुम्ही शेती करता, नोकरी करता की उद्योगधंदे करता? सरकारी नोकरी आहे की खाजगी नोकरी? कोणी बेरोजगार आहे का? घरात कार, मोटरसायकल किंवा सायकल आहे का? या सर्व गोष्टी संबंधित 60 प्रश्नांच्या माध्यमातून पडताळून गुण नोंदणी केली जाते. ही नोंदणी 3:2:1 या प्रमाणात केली जाते, यापैकी 3 सामाजिक स्थितीसाठी 2 हे शैक्षणिक स्थिती आणि 1 आर्थिक स्थितीशी संबंधित आहे. यावर सर्व काही अवलंबून आहे.
आपण 50 टक्क्यापेक्षा जास्त गुण मिळविले, तर आपण निश्चितपणे मागासवर्गीयांमध्ये मोडू शकतो. कांताराज अहवालाने 2015 मध्ये केलेले सर्वेक्षण लक्षात घेता आपण 85 टक्के गुण मिळवू शकतो. हे यासाठी महत्त्वाचे आहे की आम्ही मराठी समाज बांधव आमची जनसंख्या 40 लाख आहे असे समजतो. मात्र 1990 मधील चन्नाप्पा रेड्डी यांच्या अहवालामध्ये आमची जनसंख्या 12 लाख दाखवण्यात आली आहे. त्यानंतर कांताराज यांच्या 2015 मधील अहवालामध्ये ही संख्या 15 लाख आणि आता 2025 च्या हेगडे अहवालात 16 जनलाख दर्शविण्यात आली आहे, असे मुळे यांनी सांगितले.

समस्त मराठा समाज बंधू-भगिनींनी येत्या सर्वेक्षणामध्ये सहभागी होण्याची विनंती आम्ही यासाठी करत आहोत की सरकारला देखील माहित झालं पाहिजे की आमची जनसंख्या किती आहे. त्यामुळे सर्वेक्षणाचे जी काही प्रश्न असतील त्याची उत्तरे डोके वापरून खरी लिहावीत. प्रत्येकाने सर्व प्रश्नांची उत्तरे खरे लिहिली तर निश्चितपणे आपला समाज मागासवर्गीयामध्ये मोडू शकतो. ज्याचा लाभ सर्वांना होऊ शकतो त्यामुळे जात मराठा असे लिहिण्यास काही लाज वाटून घेण्याची गरज नाही. एकंदर फायदा व नुकसान हे आपण किती गुण मिळवणार त्यावर अवलंबून आहे.
त्यासाठीच सर्वेक्षणाच्या 60 प्रश्नांपैकी धर्म, जात, पोटजात आणि मातृभाषा हे चार प्रश्न सर्वात महत्त्वाचे आहेत. त्यामुळे सर्वांनी याची गांभीर्याने दखल घेऊन नमुना अर्जात हिंदू, मराठा, कुणबी आणि मराठी अशी नोंद करावी ही माझी जाहीर कळकळीची विनंती आहे, असे विधान परिषद सदस्य एम जे मुळे शेवटी म्हणावे. पत्रकार परिषदेस माजी आमदार ॲड. अनिल बेनके, किरण जाधव, खानापूरचे आमदार विठ्ठलराव हलगेकर, माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल नागेश देसाई, धनंजय जाधव, युवराज जाधव, वैभव क्षत्रिय मराठा परिषदेच्या श्यामसुंदर गायकवाड, वैभव कदम, मराठा समाजाचे स्थानिक नेते उपस्थित होते.


