लिंगायत पंचमसाली समाजाच्या आरक्षणासंदर्भात रायबाग (जि. बेळगाव) तालुक्यातील हारुगेरी येथे येत्या शनिवार दि. 20 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता “पंचमसाली प्रतिज्ञा क्रांति रॅली” या शीर्षकाखाली लिंगायत पंचमसाली समाजाचा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती लिंगायत पंचमसाली प्रथम जगद्गुरु श्री बसवजयमृत्युंजय स्वामीजी यांनी दिली.
बेळगाव शहरातील कन्नड साहित्य भवन येथे आज गुरुवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. स्वामीजींनी सांगितले की, आरक्षणासंदर्भात लिंगायत पंचमसाली समाज गेल्या पाच वर्षापासून भव्य रॅली काढून शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहे. बेळगाव सुवर्णविधान सौध समोर देखील मोठे आंदोलन करण्यात आले होते.
आरक्षणासंदर्भात आमच्या लिंगायत पंचमसाली वकील परिषदेने बेंगलोर उच्च न्यायालयात आणि धारवाड येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठात रिट अर्ज दाखल केला होता. तो निकाल देखील आमच्या बाजूने लागला आहे.
तथापी सरकारने आरक्षणासंदर्भातील आमच्या मागणीची अद्याप दखल घेतलेली नाही. तेंव्हा लढा तीव्र करण्याच्या हेतूने आता बेळगाव जिल्ह्यामधील रायबाग तालुक्यातील हारूगेरी येथे येत्या 20 सप्टेंबर रोजी दुपारी 11 वाजता आरक्षणासंदर्भात “पंचमसाली प्रतिज्ञा क्रांति रॅली” या नावाने विराट मोर्चा काढून आम्ही सरकारचे लक्ष वेधणार आहोत अशी माहिती देऊन लिंगायत पंचमसाली समाज बांधवांनी या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.
त्याचप्रमाणे सरकारकडून आता जे जातीनिहाय जनगणनेची मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यावेळी जनगणनेच्या फॉर्ममधील जातीच्या रकान्यामध्ये समस्त समाज बांधवांनी “लिंगायत पंचमसाली” असे नोंद करावे, असे आवाहन जगद्गुरु श्री बसवजयमृत्युंजय स्वामीजी यांनी केले. पत्रकार परिषदेस बेळगाव व रायबाग येथील लिंगायत पंचमसाली समाज प्रमुख उपस्थित होते.
हारूगेरी येथे येत्या शनिवारी सकाळी काढण्यात येणाऱ्या पंचमसाली प्रतिज्ञा क्रांति रॅलीला हारूगेरी क्रॉस येथून प्रारंभ होणार आहे. या रॅली अर्थात मोर्चाचे नेतृत्व जगद्गुरु श्री बसवजयमृत्युंजय स्वामीजी हे स्वतः करणार आहेत. तरी समाज बांधवांनी अधिक माहितीसाठी 9480111260, 9663428333, 8147862058, 9481448808 किंवा 9739437176 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


