बेळगाव लाईव्ह : जिल्ह्यातील विविध सरकारी योजनांतर्गत बँकांमध्ये दाखल झालेल्या कर्जाच्या अर्जांवर विलंब न करता तातडीने कार्यवाही करावी आणि पात्र लाभार्थ्यांना कर्ज मंजूर करावे, असे निर्देश लोकसभा खासदार जगदीश शेट्टर यांनी जिल्हा बँक अधिकाऱ्यांना दिले. जिल्हा परिषदेच्या सभागृहात सोमवारी आयोजित ‘लीड बँक प्रगती आढावा बैठकी’त ते बोलत होते. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विभागांमार्फत सादर झालेले अर्ज विनाकारण अडवून न ठेवता, सरकारी योजनांचा लाभ तत्काळ नागरिकांना मिळवून देण्याचे निर्देश शेट्टर यांनी दिले.
पीएमजेजेबीवाय, पीएमएसबीवाय आणि एपीवाय यांसारख्या योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी उपक्रम राबवावेत. त्याचबरोबर, नैसर्गिक आपत्तींपासून शेतकऱ्यांच्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये सर्व शेतकऱ्यांचा समावेश करण्यात यावा, जेणेकरून शेतकरी सर्व योजनांचा सदुपयोग करू शकतील, असे खासदार जगदीश शेट्टर यांनी सांगितले.
या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनीही, विविध विभागांमार्फत प्राप्त झालेले कर्ज मंजुरीचे अर्ज नियमानुसार त्वरित निकाली काढण्याचे निर्देश सर्व जिल्हास्तरीय बँक अधिकाऱ्यांना दिले.
“अलीकडच्या काळात बँक दरोडे आणि चोरीच्या घटना वाढत असल्याने, अधिकाऱ्यांनी बँकांच्या सुरक्षिततेबद्दल काळजी घ्यावी,” असेही त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय, कर्नाटक सरकारच्या निर्देशानुसार सर्व बँकांमधील कर्मचाऱ्यांनी सर्वसामान्य लोकांच्या सोयीसाठी जास्तीत जास्त कन्नड भाषेत व्यवहार करावेत, अशी सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी केली.
लीड बँकेचे प्रादेशिक व्यवस्थापक प्रशांत घोडाके यांनी माहिती दिली की, जून महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यातील सर्व बँकांनी कृषी क्षेत्रासाठी 1406 कोटी, औद्योगिक क्षेत्रासाठी 2653.27 कोटी, शैक्षणिक क्षेत्रासाठी 13.57 कोटी आणि गृहकर्जासाठी 75.03 कोटी असे एकूण 10,801.80 कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. तसेच, चालू वर्षासाठी 36,237.48 कोटी कर्ज वितरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.
बैठकीनंतर राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोन्नती अभियानांतर्गत महिला स्व-सहायता समूहांनी तयार केलेल्या शेवयांचे “बेळगाव संजीवनी शेवया” या शीर्षकाखाली प्रकाशन करण्यात आले.
या बैठकीला जिल्हा परिषदेचे प्रकल्प संचालक रवी एन. बंगारेप्पानावर, आरबीआयचे सहायक महाव्यवस्थापक आर. प्रभाकर, नाबार्डचे अधिकारी अभिनव यादव तसेच सर्व जिल्हा बँक अधिकारी आणि अंमलबजावणी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.




