बेळगाव लाईव्ह : सार्वजनिक वाचनालय बेळगाव या संस्थेतर्फे दरवर्षी देण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार’ यंदाच्या वर्षी ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख (पुणे) यांना जाहीर करण्यात आला असून पुरस्कार वितरण सोहळा येत्या रविवार दि. 7 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11:30 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
गणपत गल्ली, बेळगाव येथील सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहामध्ये येत्या रविवारी ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांना आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान केला जाणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप रुपये 25 हजार, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे आहे .
यापूर्वी ‘पानिपत’कार विश्वास पाटील (मुंबई), अरुण साधू (मुंबई), डॉ. जयसिंगराव पवार (कोल्हापूर), उत्तम कांबळे (नाशिक), काॅ. कृष्णा मेणसे (बेळगाव), सदानंद मोरे (पुणे) पद्मश्री मधुमंगेश कर्णिक (मुंबई), सतीश काळसेकर (मुंबई), कुमार केतकर (मुंबई), विष्णू सूर्या वाघ (गोवा), डाॅ. आ. ह. साळुंखे (सातारा),
रावसाहेब कसबे (नाशिक), डॉ राजन गवस (गारगोटी), मनस्विनी लता रवींद्र (मुंबई), प्रवीण बांदेकर (सावंतवाडी), सदानंद मोरे (निपाणी), ॲड. रमाकांत खलप (गोवा) व कृष्णांत खोत (कोल्हापूर) यांना सदर पुरस्कार देण्यात आलेला आहे.



