बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये सर्व काही सुरळीत सुरू असताना, सीमाभागातील वातावरण जाणीवपूर्वक गढूळ करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा ‘कर्नाटक रक्षण वेदिके’ (करवे) या संघटनेकडून होत आहे.
गणेशोत्सव आणि ईद मिलादच्या काळात कन्नडऐवजी मराठी, उर्दू आणि इंग्रजी भाषेला प्राधान्य दिल्याचा आरोप करत आज ‘करवे’च्या कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेच्या कार्यालयात घुसून गोंधळ घातला. यामुळे शहरात पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
‘करवे’ कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेच्या धोरणाचा निषेध करत केलेल्या आंदोलनामुळे मोठा गोंधळ उडाला. आंदोलकांनी महानगरपालिका आयुक्तांच्या कक्षात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि ‘करवे’ कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमकही झाली.
या घटनेनंतर मराठी भाषिक संघटना आणि कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दरवेळी मराठी भाषिक, मराठी भाषिक संघटना, व्यापारी आणि कार्यकर्त्यांना नाहक यात ओढून वेठीस धरले जाते.
मात्र कन्नड संघटनांच्या मूठभर कार्यकर्त्यांमुळे जाणीवपूर्वक तणाव निर्माण होतो, याकडे नेहमीच दुर्लक्ष होते. हा दुटप्पीपणा प्रशासनाने सोडून द्यावा, अशी मागणी मराठी भाषिकांकडून होत आहे.
सध्या बेळगावच्या प्रशासकीय यंत्रणेत अनेक तरुण आणि दिग्गज अधिकारी कार्यरत आहेत. अशा तरुण अधिकाऱ्यांकडून योग्य आणि न्याय्य पद्धतीने प्रशासन हाताळले जावे, तसेच सर्वांसाठी समान असणाऱ्या कायद्याचा सन्मान राखून कार्यशैली राबवावी, अशी अपेक्षा मराठी भाषिकांसह सर्वसामान्यांना आहे.
याच पार्श्वभूमीवर, ‘करवे’ कार्यकर्त्यांनी नामफलकांवरून मराठी, उर्दू आणि इंग्रजीचा वापर पूर्णपणे थांबवून कन्नडला प्रथम प्राधान्य देण्याची मागणी करत, आयुक्त शुभा बी. यांना एक निवेदनही सादर केले आहे. यावर प्रशासनाने निष्पक्ष भूमिका घेऊन न्याय द्यावा, अशी मागणी मराठी भाषिक करत आहेत.


