belgaum

आमच्या गावाचे लवकरात लवकर करा स्थलांतर -आमगाव ग्रामस्थांची मागणी

0
37
 belgaum

बेळगाव लाईव्ह :१रस्ते, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सेवा वगैरे मूलभूत नागरी सुविधांचा अभाव असलेल्या आणि पावसाळ्यात 4 महिने जगाशी संपर्क तुटणाऱ्या खानापूरच्या घनदाट जंगल प्रदेशातील आमगाव या गावाचे योग्य अशा एकाच ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावी, अशी मागणी सदर गावच्या ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

आमगाव ग्रामस्थांनी उपरोक्त मागणीचे निवेदन आज मंगळवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. आमगाव हे खानापूर तालुक्यातील भीमगड अभयारण्यात वसले आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून अनेक दशके उलटली तरी आमटे ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या घनदाट जंगलातील या गावांमध्ये अद्याप कोणत्याही मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध नाहीत.

रस्ते, गटारी, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय, वैद्यकीय सेवा वगैरे कोणतीही सुविधा, तसेच रोजगार उपलब्ध नसल्यामुळे या गावातील जवळपास 250 कुटुंबांना खडतर परिस्थितीत जीवन जगावे लागत आहे. वाहतुकीची सोय नसल्यामुळे जीवनावश्यक साहित्यसाठी गावातील लोकांना अनेक किलोमीटरची पायपीट करावी लागते.

 belgaum

पावसाळ्यामध्ये तर जवळपास 4 महिने आमगावचा बाहेरील जगाशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटलेला असतो. त्यामुळे या काळात परिस्थिती आणखीनच भयंकर झालेली असते. वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्यामुळे यापूर्वी अनेकांच्या जीवावर बेतले आहे. याचे जिवंत उदाहरण म्हणजे गेल्या वर्षी 19 जुलै 2024 रोजी घडलेला या गावातील हर्षदा घाडी या महिलेचा मृत्यू होय.

वैद्यकीय सेवा उपलब्ध नसल्यामुळे सदर प्रकृती अत्यवस्थ झालेल्या महिलेचा जीव वाचवण्यासाठी जंगलातील लाकडांचे स्ट्रेचर तयार करून गावकऱ्यांनी तिला खानापूर तालुका केंद्राच्या ठिकाणी आणि त्यानंतर बेळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणून दाखल केले. मात्र उपचाराचा फायदा न होता तिचे निधन झाले. एकंदर प्रतिकूल परिस्थिती आणि वातावरणामुळे घनदाट जंगलात वास्तव्य करणे दिवसेंदिवस कठीण होत चालले असल्यामुळे गावाच्या भवितव्याच्या दृष्टीने आमगावचे लवकरात लवकर योग्य अशा एकाच ठिकाणी स्थलांतर करण्यात यावे, अशा आशयाचा तपशील आमगाव ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात नमूद आहे.

निवेदन सादर करतेवेळी बाबू गावडे, एकनाथ गावडे, राजन घाडी, संतोष घाडी, सुदेश गावडे, सुरेश देवळी, सुरज दळवी, संजय घाडी, सुधाकर घाडी, हरिश्चंद्र घाडी आदींसह बरेच गावकरी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.