बेळगाव लाईव्ह :कंग्राळी खुर्द (ता. जि. बेळगाव) येथील बाल हनुमान तालीम मंडळाचा 22 वर्षीय आघाडीचा पैलवान कामेश पाटील याने म्हैसूर येथील कर्नाटक दसरा कुस्ती स्पर्धा गाजवताना “कंठीरवा केसरी -2025” हा प्रतिष्ठेचा किताब पटकावला आहे. या पद्धतीने हिंदकेसरी चंबा मुत्नाळ यांच्यानंतर तब्बल 5 दशकांनंतर बेळगाव जिल्ह्याला मानाची कंठीरवा केसरी गदा मिळवून देण्याची ऐतिहासिक कामगिरी कामेश याने केली आहे.
कंग्राळी खुर्दच्या बाल हनुमान तालीम मंडळामध्ये कुस्तीचा श्रीगणेशा करणारा कामेश पाटील हा सध्या महाराष्ट्रात महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. म्हैसूर येथील यंदाच्या प्रतिष्ठेच्या कंठीरवा केसरी किताबासाठी असलेल्या राज्यस्तरीय दसरा कुस्ती स्पर्धेमध्ये कामेश याने प्रारंभापासूनच आपले वर्चस्व राखले होते.
लक्षवेधी अंतिम लढतीत देखील प्रतिस्पर्धी मल्लाला वरचढ होऊ न देता पराभूत करून कामेश पाटील याने मानाचा कंठीरवा केसरी किताब व गदा हस्तगत केली. यापूर्वी बेळगाव जिल्ह्यातील मुत्नाळ गावचे हिंदकेसरी मल्ल चंबा मुत्नाळ यांनी कुस्ती क्षेत्रातील आपल्या प्रारंभीच्या उत्कर्षाच्या काळात म्हणजे सत्तरच्या दशकात कंठीरवा केसरी किताब मिळविला होता.
त्यानंतर तब्बल 5 दशकांनंतर त्याची पुनरावृत्ती करताना आता कामेश पाटील याने बेळगाव जिल्ह्याला कंठीरवा केसरी किताबाचा सन्मान मिळवून दिला आहे. सदर ऐतिहासिक कामगिरीबद्दल पैलवान कामेश पाटील याच्यावर सध्या अभिनंदनचा वर्षाव होत आहे.




