बेळगाव लाईव्ह : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील जय किसान भाजी मार्केटवर बेळगाव शहर विकास प्राधिकरणाने (बुडा) अन्यायकारक कारवाई केल्याचा आरोप करत जय किसान भाजी मार्केटच्या व्यापाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली.
यावेळी बोलताना जय किसान भाजी मार्केटचे वकील संजय पाटील यांनी ‘बुडा’ने दिलेला आदेश रद्द करण्याचे अधिकार ‘बुडा’ला नाहीत, असे म्हटले. या आदेशाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून, न्यायालयाने ‘बुडा’ला कोणताही कठोर निर्णय न घेण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना वाहतुकीची आणि विक्रीची सोय व्हावी या उद्देशाने जय किसान भाजी मार्केटची स्थापना करण्यात आली आहे. हे मार्केट २०२१ पासून कार्यरत आहे. मात्र, ‘बुडा’ने मार्केटला सात दिवसांत उत्तर देण्याची नोटीस पाठवली होती. मार्केटने १५ दिवसांची मुदत मागितली असतानाही ‘बुडा’ने तातडीने १० एकर २८ गुंठे जागेचे कृषी क्षेत्रातून व्यावसायिक क्षेत्रात रूपांतर करण्याचा आदेश रद्द केला, ‘बुडा’ने दिलेला आदेश रद्द करण्याचे अधिकार ‘बुडा’ला नाहीत.
यासंदर्भात आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, न्यायालयाने आम्हाला दिलासा दिला आहे. १२ सप्टेंबर २०२५ रोजी या याचिकेवर सुनावणी होणार असून, न्यायालयाने दोन्ही पक्षांना आपली कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले आहेत असे त्यांनी सांगितले.

‘बुडा’च्या या आदेशामुळे जय किसान भाजी मार्केटमधील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबद्दल बोलताना व्यापारी मनोहर मन्नोळकर म्हणाले, ‘आम्हाला आमचा व्यवसाय कसा वाचवायचा याची चिंता आहे. यामुळे व्यापाऱ्यांचे मनोबल खचले आहे.’
जय किसान भाजी मार्केटच्या पदाधिकाऱ्यांनी महापौर आणि आयुक्तांची भेट घेऊन ‘बुडा’च्या आदेशानुसार कोणतीही कारवाई करू नये अशी विनंती केली आहे. या आधी २०१९ मध्येही मार्केट बंद करण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र तो यशस्वी झाला नाही. आता पुन्हा असाच प्रयत्न होत आहे, असा सूर व्यापारी वर्गातून व्यक्त होत असून या प्रकरणी आता न्यायालयाच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





