बेळगाव लाईव्ह : शेतकऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष आणि परवान्याच्या अटी-शर्तींचा वारंवार भंग केल्यामुळे बेळगावमधील ‘जय किसान होलसेल व्हेजिटेबल मर्चंट असोसिएशन’ला मोठा धक्का बसला आहे. कृषी पणन विभागाने या खासगी भाजी मार्केटचा परवाना रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे.
‘जय किसान’ भाजी मार्केट विरोधात अनेक शेतकरी संघटनांनी सातत्याने तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींमध्ये, मार्केट प्रशासन परवान्याच्या नियमांचे पालन करत नाही आणि शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी कोणतीही पाऊले उचलत नाही, असे म्हटले होते. या तक्रारींची गंभीर दखल घेऊन कृषी पणन विभागाने सरकारी अधिकाऱ्यांच्या पथकामार्फत मार्केटची सखोल तपासणी केली.
या तपासणी अहवालांमध्ये, ‘जय किसान’ने परवान्याच्या अटी आणि शर्तींचा स्पष्टपणे भंग केल्याचे समोर आले. तसेच, शेतकरी आणि त्यांच्या मालाचे संरक्षण करण्यात मार्केट पूर्णपणे अपयशी ठरल्याचेही सिद्ध झाले. त्यामुळे, ‘एपीएमसी’ निर्देशकांनी योग्य आणि कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला.

यापूर्वी, बेळगाव अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटीने भूखंडाच्या वापराबाबतचा आदेश रद्द केल्याने ‘जय किसान’ मार्केटच्या अडचणी वाढल्या होत्या. ‘बुडा’च्या या कारवाईनंतर व्यापाऱ्यांनी महानगरपालिकेकडे धाव घेतली होती. पण आता कृषी पणन विभागानेही थेट परवाना रद्द केल्यामुळे व्यापाऱ्यांसमोरील संकट अधिक गहिरे झाले आहे. ‘कर्नाटक कृषी उत्पन्न बाजार व्यवहार (नियंत्रण आणि विकास) अधिनियम, १९६६’ च्या कलम ७२-डी अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर करून हा परवाना तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात आला आहे.
या दुहेरी कारवाईमुळे खासगी भाजी मार्केटमधील व्यापाऱ्यांमध्ये गोंधळाचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, मार्केटच्या भवितव्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.



