बेळगाव लाईव्ह : सरकारी नियमानुसार ‘जय किसान’ सारख्या खाजगी होलसेल भाजी मार्केटला परवानगी देण्याची सरकार प्रणालीत कोणतीही तरतूद नाही. मात्र, ‘जय किसान’च्या सर्व व्यापाऱ्यांसाठी एपीएमसी भाजी मार्केटमध्ये जागा उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली.
बेळगाव शहरात आज बुधवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ‘जय किसान’ भाजी मार्केट बंद होऊन विस्थापित होण्यासाठी आपण कारणीभूत असल्याचा जो आरोप केला जात आहे, यावर स्पष्टीकरण देताना मंत्री जारकीहोळी म्हणाले की, “सदर भाजी मार्केट बंद करण्याचा आदेश माझ्या (सतीश जारकीहोळी) नावावर काढलेला आहे की कायद्याची कलमे नमूद करून काढण्यात आला आहे? तो आदेश कायदेशीर कलमांनुसारच जारी झाला आहे.”
राज्य सरकारच्या प्रणालीमध्येच खाजगी मार्केटला परवानगी देण्याची तरतूद नाही. खाजगी मार्केटला परवानगी देण्याचा अधिकार केवळ केंद्र सरकारला आहे. एपीएमसी मार्केट हे पूर्णपणे सरकारच्या नियंत्रणाखाली येते. ‘जय किसान’ होलसेल भाजी मार्केटसंदर्भात आतापर्यंत रस्त्यावरील आंदोलन, मोर्चे, न्यायालयीन लढा असे सर्व प्रयत्न झाले. शेवटी, सरकारनेच हे भाजी मार्केट बंद करण्याचा आदेश दिला आहे. सतीश जारकीहोळी हे केवळ शासनाचा एक भाग आहेत.
बेळगाव एपीएमसी येथील भाजी मार्केटमध्ये ‘जय किसान’च्या’ व्यापाऱ्यांसाठी मुबलक जागा उपलब्ध आहे. “आम्ही आता जिल्हाधिकारी यांच्यासह या जागेची पाहणी करण्यासाठी जाणार आहोत,” अशी माहिती त्यांनी दिली. एपीएमसीमध्ये स्थलांतरित होण्याचे आवाहन ‘जय किसान’ भाजी मार्केटच्या व्यापाऱ्यांना करण्यात आले आहे.
या संदर्भात प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समितीही स्थापन झाली आहे. ‘जय किसान’मधील व्यापारी एपीएमसी भाजी मार्केटमध्ये स्थलांतरित होण्यास तयार देखील आहेत, असे सांगून, त्यांचे स्थलांतर हे सर्वांच्या हिताचे ठरणार आहे, असे जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी नमूद केले.
पत्रकार परिषदेस बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ (राजू) सेठ यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.




