बेळगाव लाईव्ह :शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या हितासाठी जय किसान होलसेल भाजी मार्केटसंदर्भात जारी करण्यात आलेला भू -वापर बदलाचा आदेश त्वरित मागे घेण्यात यावा, या मागणीसाठी जय किसान होलसेल व्हेजिटेबल मर्चंट असोसिएशनच्या नेतृत्वाखाली आज व्यापारी व शेतकऱ्यांनी बेळगाव बुडा आयुक्त कार्यालयासमोर धरणे धरून आपल्या मागणीचे निवेदन त्यांना सादर केले.
बेळगाव शहरातील जय किसान भाजी मार्केटच्या 10 एकर 20 गुंठे जागेचे लँड युज अर्थात भू-वापर बदलाचा आदेश बेळगाव शहर विकास प्राधिकरणाचे (बुडा) आयुक्त शकील अहमद यांनी अलीकडे बजावला आहे. परिणामी भवितव्याचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे संबंधित आदेश रद्द केला जावा यासाठी महापौर, जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांना साकडे घातल्यानंतर जय किसान भाजी मार्केट मधील व्यापाऱ्यांनी आज सोमवारी सकाळी बुडा आयुक्तांचे कार्यालय गाठले.
त्या ठिकाणी संतप्त व्यापाऱ्यांनी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांवर ठिय्या मारून धरणे आंदोलन सुरू केले. यावेळी जारी केलेल्या आदेश मागे घ्यावा, व्यापारी व शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी करत जोरदार निदर्शने करण्यात आली. त्यानंतर जय किसान होलसेल व्हेजिटेबल मर्चंट असोसिएशन पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली बुडा आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले.
तथापि आयुक्त बैठकीसाठी बेंगलोरला गेले असल्यामुळे त्यांच्या गैरहजेरी त्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार केला. निवेदन सादर करतेवेळी जय किसान व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बुडा आयुक्तांनी बजावलेला आदेश असा चुकीचा आणि अन्यायकारक आहे याची माहिती दिली.

बुडा आयुक्तांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून साहेब बेंगलोरहून येताच व्यापाऱ्यांची बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले. याप्रसंगी जय किसान भाजी मार्केट मधील व्यापाऱ्यांसह शेतकरी संघटनेचे नेते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना शेतकरी संघटनेचे नेते राघवेंद्र नाईक म्हणाले की, गेल्या कांही वर्षांपासून बेळगावचे एपीएमसी भाजी मार्केट आणि जय किसान भाजी मार्केट यांच्याबद्दल वाद सुरू आहे. शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने त्यापैकी कोणतेही भाजी मार्केट बंद होऊ नये अशी आमची इच्छा आहे.




आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार जय किसान भाजी मार्केट हे उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सुरू आहे हे भाजी मार्केट राष्ट्रीय महामार्गावर असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी सोयीचे आहे. तथापि बुडा आयुक्तांनी नुकत्याच काढलेल्या आदेशामुळे मानसिक ताण वाढवून इस्माईल मुजावर नावाच्या एका व्यापाऱ्याचा हृदयघाताने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. शेतकरी असो किंवा व्यापारी त्यांना सरकार किंवा सरकारी अधिकाऱ्यांनी केलेल्या चुकीची शिक्षा भोगावे लागू नये एवढेच आमचे म्हणणे आहे.
शेतकरी, व्यापारी आपल्या व्यवसाय वृद्धीसाठी मोठी मेहनत घेत असतात. आपल्या व्यवसायासाठी त्यांनी मोठी गुंतवणूकही केलेली असते. अशा परिस्थितीत एखादा चुकीचा निर्णय त्यांचे जीवन उध्वस्त करू शकतो. कोणतेही भाजी मार्केट बंद होऊ नये असे आमच्या संघटनेला वाटते तथापि त्यातल्या त्यात जय किसान भाजी मार्केट हे तुलनात्मक दृष्ट्या शेतकऱ्यांसाठी अनुकूल आहे. त्यामुळे ते बंद केले जाऊ नये. तसेच मयत व्यापारी इस्माईल मुजावर याच्या कुटुंबीयांना सरकारने 1 कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करून यापुढे व्यापारी पर्यायाने शेतकऱ्यांवर अन्याय झाल्यास उग्र आंदोलन होईल. यापुढे कोणताही निर्णय घेताना अथवा आदेश काढताना प्रथम शेतकऱ्यांचे हित लक्षात घेतले गेले पाहिजे, असे राघवेंद्र नाईक यांनी शेवटी स्पष्ट केले.
जय किसान होलसेल भाजी मार्केटमधील व्यापारी मोहन मन्नोळकर यांनी यावेळी बोलताना, भू-वापर परवाना रद्द करण्याचा त्याच्या बदलाचा बुडा आयुक्तांनी काढलेला आदेश चुकीचा आहे. जय किसान भाजी मार्केटचा भू-वापर परवाना रद्द करू नये अशी आमची विनंती आहे.
त्या आदेशामुळे धसका घेतलेल्या इस्माईल मुजावर या आमच्या सहकारी व्यापाऱ्याचे हृदयविकाराने निधन झाले. त्याच्या मृत्यूस बुडा आयुक्तांसह सिदगौडा मोदगी, राजू टोपण्णावर, सुजित मुळगुंद, व्यापारी सदा पाटील, बसनगौडा पाटील, सतीश पाटील आसिफ कलमनी आणि विनायक राजगोळकर हे जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे, असे सांगितले.




