बेळगाव लाईव्ह :गांधीनगरमध्ये राष्ट्रीय महामार्गालगत बांधलेल्या खासगी जय किसान भाजी मार्केटचा भू-वापर बदल बुडाने रद्द केला आहे.
या आदेशाला स्थगिती मागणारी याचिका खासगी मार्केट व्यवस्थापनाने उच्च न्यायालयात दाखल केली आहे. मात्र, मंगळवारी यावर सुनावणी होऊ न शकल्याने भाजी मार्केट व्यवस्थापनाला दिलासा मिळाला नाही. आता यावरील सुनावणी १२ रोजी आहे.
खासगी जय किसान भाजी मार्केटने मृत बसलिंगप्पा भावी यांच्या नावे जमिनीची खोटी कागदपत्रे देऊन भू-वापर बदल करुन घेतल्याचा आरोप आहे. त्यामुळे, बुडाने खोटी माहिती सादर केली असा ठपका ठेवत
भू-वापर बदल रद्द केला आहे. याविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय जय किसानच्या व्यवस्थापनाने घेतला होता. त्यानुसार उच्च न्यायालयात या आदेशाला स्थगिती मागणारी याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर मंगळवारी सुनावणी होती. मात्र, न्यायालयाने ही सुनावणी १२ सप्टेंबरपर्यंत लांबणीवर टाकल्याने जय किसान व्यवस्थापनाला दिलासा मिळाला नाही.







नियुक्त न्यायमूर्ती रजेवर असल्याने प्रकरण प्रभारी न्यायमूर्तीसमोर सुनावणीसाठी आले होते. सिद्धगौडा मोदगी यांच्या वतीने अॅड. नितीन बोळबंदी आणि ज्येष्ठ वकील अनंत मंडगी यांनी बाजू मांडली. बुडाचे वकील न्यायालयात हजर राहिले नाहीत. मात्र, प्रभारी न्यायमूर्तीनी स्थगिती देण्यास असमर्थता प्रकट करत पुढील सुनावणी १२ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली. तोपर्यंत जय किसान भाजी मार्केट व्यवस्थापनाला प्रतीक्षा करावी लागणार आहे.




