बेळगाव लाईव्ह :जिल्ह्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या हुक्केरी विद्युत सहकारी संघ संचालक मंडळाच्या काल रविवारी रात्री उशिरा पार पडलेल्या निवडणुकीमध्ये दणदणीत विजय मिळवताना माजी खासदार रमेश कत्ती पॅनलने तब्बल 15 जागा जिंकल्या आहेत. या विजयाद्वारे माजी खासदार रमेश कत्ती आणि माजी मंत्री ए बी पाटील या द्वयींनी जाकीहोळी बंधूंना मोठा धक्का दिला आहे.
हुकेरी विद्युत सहकारी संघाची निवडणूक प्रतिष्ठेची करणाऱ्या जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना त्यांच्या तीन भावांचा देखील पाठिंबा मिळाला होता. त्यामुळे त्यांचे पारडे जड वाटत होते. तथापि काल रविवारी रात्री उशिरापर्यंत झालेल्या मतमोजणीमध्ये माजी खासदार रमेश कत्ती गटाने तब्बल 15 जागा जिंकून जाकीहोळी गटाला पराभवाचा धक्का दिला आहे.
या निवडणुकीत माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या गटालाही पराभवाचा सामना करावा लागला असून त्यांच्या पॅनलला एकही जागा जिंकता आली नाही.
जारकीहोळी सहकाऱ्यांवर दगडफेक : हुक्केरी विद्युत सहकारी संघाच्या निवडणुकीचा निकाल काल रात्री उशिरा जाहीर होताच माजी खासदार रमेश कत्ती यांच्या पॅनल मधील उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी विजयोत्सव साजरा केला. तथापि विजयोत्सवावेळी कत्ती समर्थकांनी गैरवर्तन करत मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या जवळच्या सहकाऱ्यांच्या गाड्यांवर हाताने मारबडव करण्यासह दगडफेकही केली.
सदर प्रकारामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून दोन्ही गटाच्या समर्थकांना पाहून परिस्थिती नियंत्रणाखाली आणली.
निवडणुकीपूर्वी माजी खासदार रमेश कत्ती यांनी जारकी होळी बंधूंवर जोरदार हल्लाबोल केला होता त्यांनी एकेरी शब्द त्यांच्यावर टीका केली होती त्याचेच पडसाद कालच्या विजयोत्सवाप्रसंगी उमटले





