बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर आणि ग्रामीण भागात दुचाकी चोरून धुमाकूळ घालणाऱ्या एका सराईत आरोपीला हिरेबागेवाडी पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याच्याकडून तब्बल पाच मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून, अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत.
बेळगाव शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे , पोलीस उपायुक्त नारायण भरमणी, निरंजन राजे अरस आणि एसीपी बी. एम. गंगाधर यांच्या आदेशानंतर हिरेबागेवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुंद्रेश होळेन्नवर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या प्रकरणाची उकल केली आहे.
याप्रकरणी इंचल, ता. सवदत्ती येथील संतोष शिवप्पा उर्फ शिवानंद बेविनकोप्पा याला अटक करण्यात आली असून हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात चोरीला गेलेल्या मोटारसायकलसह त्याने एकूण पाच मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली आहे.
विशेष म्हणजे, या चोरट्याने केवळ हिरेबागेवाडी किंवा बेळगावातच नव्हे, तर बेळगाव-श्रीनगर, मुनवल्ली, हुबळी आणि बेळगाव-वडगाव येथील दुचाकी चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलीस पथकाच्या या कारवाईमुळे पोलीस आयुक्त कार्यालयाने या कामगिरीबद्दल पथकाचे कौतुक केले आहे.





