belgaum

हिंदूंच्या उपजातीतील ‘ख्रिश्चन’ नांव हटवण्याची हिंदू जनजागरण समितीची मागणी

0
88
 belgaum

बेळगाव लाईव्ह :कर्नाटक राज्य मागासवर्गीय आयोगाकडून हाती घेण्यात येणाऱ्या सामाजिक आणि शैक्षणिक निकषांवरील जातीनिहाय जनगणतीमध्ये सर्व जातींच्या उपजातींमध्ये ‘ख्रिश्चन’ या नव्या उपजातीचा करण्यात आलेला समावेश हटवण्यात यावा, अशी मागणी हिंदू जनजागरण समिती बेळगावने एका निवेदनाद्वारे राज्यपालांकडे केली आहे.

हिंदू जनजागरण समिती बेळगावतर्फे अध्यक्ष जयतीर्थ सौंदत्ती यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन राज्यपालांना धाडण्यासाठी आज बुधवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. याप्रसंगी भाजप नेते माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ श्रीनिवास बी., नागराज पाटील, गीता सुतार, श्रेयस नाकाडी आदिंसह हिंदू जनजागरण समितीचे बहुसंख्य सदस्य उपस्थित होते.

यावेळी प्रसिद्ध माध्यमांना माहिती देताना भाजप नेते महांतेश कवटगीमठ यांनी सांगितले की, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील काँग्रेस सरकारने मधुसूदन नायक यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा एकदा मागासवर्गीयांच्या आयोगाची स्थापना केली आहे. या आयोगाकडून राज्यात सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक निकषांवर जातीनिहाय जनगणती सुरू करण्यात येणार आहे. या पद्धतीने एका दृष्टिकोनातून हिंदू समाजामध्ये फुट पाडण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतला आहे. जातीनिहाय जनगणती संदर्भात त्यांनी जारी केलेला फॉर्म पाहिला तर त्यामध्ये हिंदू समाजातील जातींमध्ये ‘ख्रिश्चन’ असा शब्द समाविष्ट करण्यात आला आहे.

 belgaum

याचा हिंदू जनजागरण समितीच्या माध्यमातून बेळगाव शहर आणि ग्रामीण प्रदेशातील हिंदू जनजागृती समितीचे सर्व सदस्य आणि हिंदू समाज बांधव तीव्र निषेध करत आहेत. हिंदू समाजात फूट पाडण्याचा आपला प्रयत्न सरकारने ताबडतोब थांबवावा. येत्या 25 सप्टेंबर पासून सुरू करण्यात येणारी जातीनिहाय जनगणती तात्काळ रद्द करण्यात यावी.

त्याचप्रमाणे हिंदू समाजातील उपजातींमध्ये समाविष्ट करण्यात आलेला ‘ख्रिश्चन’ हे नांव ताबडतोब हटवण्यात यावे. आमच्या या मागणीची पूर्तता न झाल्यास आम्ही मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षांसह राज्यपालांची भेट घेणार आहोत. त्याचप्रमाणे या संदर्भात आम्ही कायदेशीर लढा देखील सुरू केला आहे. तेव्हा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपला निर्धार बदलून ताबडतोब जातीनिहाय जनगणती प्रक्रिया थांबवावी आणि हिंदू समाजाची माफी मागावी, असे महांतेश कवटगीमठ म्हणाले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.