बेळगाव लाईव्ह :श्री अनंत चतुर्दशी समीप येत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापौर मंगेश यांच्यासह आमदार असिफ (राजू) सेठ, शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे आणि महापालिका आयुक्त शुभा बी. यांनी आज सकाळी शहरातील श्री गणेश विसर्जन मिरवणूक मार्गाचा पाहणी दौरा केला.
दरवर्षीप्रमाणे ऐतिहासिक अशी बेळगावची यंदाची श्री गणेश विसर्जन मिरवणूक शांततेने सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासनाकडून सर्व ते क्रम हाती घेण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने आज सोमवारी सकाळी महापौर मंगेश पवार, आमदार असिफ (राजू) सेठ, शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे आणि महापालिका आयुक्त शुभा बी. यांनी श्री गणेश विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी केली.
याप्रसंगी त्यांच्या समवेत कांही नगरसेवक, सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाचे पदाधिकारी, सदस्य आणि हेस्कॉम, पोलीस वगैरे संबंधित खात्याचे अधिकारी उपस्थित होते. सदर पाहणी दौऱ्या दरम्यान आमदार सेठ आणि महापौर पवार यांनी सोबत असलेल्या अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या.
पाहणी दौऱ्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना आमदार असिफ (राजू) सेठ यांनी श्री गणेश विसर्जन मिरवणूक कोणताही त्रास न होता शांततेने सुरळीतपणे पार पडावी हा आमच्या आजच्या या पाहणी दौऱ्याचा उद्देश आहे, असे सांगितले.





माझी श्री गणेशोत्सव महामंडळांसह सर्व गणेश मंडळांना विनंती आहे की श्री विसर्जन मिरवणूक वेळेवर सुरू केली जावी. तसे झाल्यास कोणालाही त्रास होणार नाही. यावेळी श्री धर्मवीर संभाजी महाराज चौकातील प्रेक्षक गॅलरी देखील आणखी मोठी केली जाईल. हेस्कॉम आणि महापालिका मिरवणूक मार्गावरील अडथळे दूर करण्याच्या कामाला लागले आहेत.
त्याचप्रमाणे रस्त्यावरील ओव्हरहेड विजेच्या तारा किंवा केबल्स वर ओढण्यात येतील. यासाठी जिओ वगैरेंना विनंती आहे की त्यांनी त्वरेने त्यांच्या केबल्स सुरक्षित वर ओढाव्यात, अन्यथा महापालिकेचे कर्मचारी येऊन त्या केबल तोडतील ज्यामुळे संबंधितांचे नुकसान होईल.
शहरासह परगावहून विसर्जन मिरवणूक पाहण्यास येणाऱ्या लोकांना त्रास न होता ते मिरवणुकीचा आनंद लुटू शकतील यासाठी आमचे प्रयत्न असणार आहेत. तसेच जक्कीनहोंड, कणबर्गी, कपिलेश्वर या विसर्जन तलावाच्या ठिकाणी सहकुटुंब श्री गणेश दर्शनास येणाऱ्या पालकांनी दुर्घटना टाळण्यासाठी आपल्या मुलांना स्वतः सोबत ठेवावे त्यांची काळजी घ्यावी, असे आवाहन करून एकंदर आपण सर्वांनी श्री अनंत चतुर्दशीची विसर्जन मिरवणूक शांततेने सुरळीत पार पाडूया, असे आमदार सेठ शेवटी म्हणाले.



महापौर मंगेश पवार यांनी सांगितले की, आजच्या पाहणी दौऱ्यादरम्यान श्री विसर्जन मिरवणूक मार्गावर बऱ्याच ठिकाणी केबलच्या वायरी रस्त्यावर खाली आल्याचे निदर्शनास आले आहे. श्री गणेशाच्या उंच मूर्तींसाठी या वायरी घातक ठरू शकतात. तेंव्हा संबंधित कंपनी अथवा केबल ऑपरेटर्सनी मिरवणूक मार्गावर खाली आलेल्या केबल्स वर ओढाव्यात मिरवणुकीचा मार्ग असलेल्या रामदेव गल्ली वगैरे ठिकाणच्या खुल्या गटारी बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
त्याचप्रमाणे श्री गणेश भक्त व जाणकारांच्या सूचनेवरून धर्मवीर संभाजी महाराज चौकातील प्रेक्षक गॅलरी देखील यांना आणखी मोठी केली जाणार आहे श्री विसर्जन मिरवणूक सुरळीत पार पडावी यासाठी महापालिकेकडून आवश्यक सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणारा असून त्यांचा योग्य प्रकारे विनियोग केला जावा असे सांगून विसर्जन मिरवणुकीला वेळेवर प्रारंभ केल्यास कोणालाही त्रास होणार नाही. तेंव्हा सर्व सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळांनी आपले गणपती वेळेवर विसर्जन मिरवणुकीमध्ये आणावेत, असे आवाहन महापौर पवार यांनी केले.


