बेळगाव लाईव्ह : ऐतिहासिक गणेशोत्सवाची परंपरा लाभलेल्या बेळगाव शहरात उद्या भव्य आणि दिव्य गणेश विसर्जन मिरवणूक निघणार असून, त्यासाठी बेळगाव पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या शांततेत गणेश विसर्जन पार पाडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
उद्या बेळगावात गणेश विसर्जन होणार असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस सज्ज आहेत. पोलीस आयुक्तांच्या निर्देशानुसार, नियुक्त केलेल्या ठिकाणी पोलीस सेवा बजावतील.
बंदोबस्तासाठी 500 वरिष्ठ अधिकारी आणि 3000 कनिष्ठ अधिकारी, रॅपिड ॲक्शन फोर्स, 10 के.एस.आर.पी तुकड्या, 9 सी.ए.आर तुकड्या, 700 कॅमेरे आणि 14 ड्रोनचा वापर करण्यात येत आहे.
गेल्या 1 महिन्यापासून पोलीस विभाग गणेशोत्सव मंडळांच्या सतत संपर्कात आहे. शांततापूर्ण गणेश विसर्जनासाठी लोकांनीही पोलीस विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
गणेश विसर्जन मिरवणुकीला उद्या सायंकाळी 4 वाजता प्रारंभ होईल. अनेक मंडळांनी पारंपरिक वाद्यांचा वापर करण्याचा घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. मिरवणुकीच्या मार्गावर 45 रुग्णालये आहेत, त्यामुळे डीजे वापरणाऱ्यांनी याचा विचार करून ध्वनी यंत्रणांचा वापर करावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
गेल्या 10 वर्षांच्या इतिहासात घडलेल्या कोणत्याही समस्या पुन्हा उद्भवू नयेत यासाठी दक्षता घेतली जात असून शहरी भागात तब्बल 1019 गणेश मूर्तींचे आणि ग्रामीण भागात मोठ्या संख्येने गणेश मूर्तींचे विसर्जन होणार आहे अशी माहिती पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली.


