बेळगाव लाईव्ह : येत्या ६ सप्टेंबर रोजी बेळगाव शहरात होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करून शांततामय मार्गाने विसर्जनासाठी सहकार्य करावे, असे आवाहन बेळगावचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी केले.
आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी याबाबत माहिती दिली. ६ सप्टेंबर रोजीच्या मिरवणुकीसाठी आयजी, केएसआरपी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलीस दलाची नियुक्ती करण्यात आली आहे.
“विसर्जनासाठी १ डीआयजी, ७ एसपी, २५ डीएसपी, ८७ इन्स्पेक्टर आणि २५० पीएसआय, एएसआय यांच्यासह अतिरिक्त अधिकारी व कर्मचारी नेमण्यात आले आहेत,” असे आयुक्त म्हणाले.
पोलीस आयुक्त भूषण बोरसे पुढे म्हणाले की, विसर्जन तलावांमधील मूलभूत सुविधांची पाहणी करण्यात आली असून, खबरदारीचा उपाय म्हणून लाईफ जॅकेटचीही सोय करण्यात आली आहे.
तसेच, शहरातील १७ ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. डीजेसाठी डेसिबलची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. “बळ्ळारीमध्ये फटाक्यांच्या दुर्दैवी घटनेमुळे खबरदारी म्हणून बेळगावमध्ये हा निर्णय घेण्यात आला असून गणेश विसर्जन मिरवणुकीत फटाके फोडण्यास सक्त मनाई आहे,” असे त्यांनी सांगितले.
पोलिसांच्या सोयीसाठी बॅरीकेड्सचा वापर करून चांगली व्यवस्था करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.




