बेळगाव लाईव्ह :प्रवास करणे तसे सामान्य असले तरी, आपल्या भावंडांसह, नणंद-भावजयी, भावोजी-मेहुण्यांसोबत केलेल्या प्रवासाची मजा काही वेगळीच असते. अशाच एका अविस्मरणीय प्रवासातून गवी कुटुंबातील भावंडं आणि कुटुंबीय नुकतेच परतले आहेत. या वयातही या ज्येष्ठांनी आयुष्यात पहिल्यांदाच विमानाने प्रवास करण्याचा अनोखा अनुभव घेत, हैदराबाद आणि हुबळी येथील अनेक प्रेक्षणीय स्थळांना भेटी दिल्या.
या प्रवासात सिदगोंडा नागाप्पा गवी, भरमा नागाप्पा गवी, शंकर नागाप्पा गवी, यांच्यासह भगिनी पद्मा वसंत पाखरे, रेणुका अर्जुन कटांबले आणि प्रभा कृष्णा सांबरेकर, सौ. शांता सिदगोंडा गवी, सौ. वासंती नारायण गवी, सौ. प्रभा शंकर गवी, सौ. राजेश्वरी, अर्जुन कटांबले आणि कृष्णा सांबरेकर यांचाही सहभाग होता.
आजवर त्यांनी भारतभर रेल्वे, बस, आणि खासगी वाहनांनी अनेक प्रवास केले होते, पण या वयात एकदा तरी विमानातून भरारी घ्यायची, हे त्यांचे स्वप्न होते. हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी भरमा नागाप्पा गवी यांनी या सहलीचे आयोजन केले.
गेले सहा महिने या सहलीचे नियोजन सुरू होते. घरातील वडीलधारी मंडळी विमान प्रवास करणार याचा आनंद जितका त्यांना होता, त्याहून अधिक आतुरता घरातील तरुण पिढीला होती. सहलीसाठी सामानाची बांधणी झाली आणि अख्खं कुटुंब ज्येष्ठांना निरोप देण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी बेळगाव रेल्वे स्थानकावर दाखल झाले.
आपल्या सोयीसाठी व्हॉट्सॲप ग्रुपचा वापर करणाऱ्या या ज्येष्ठांनी वेळोवेळी सहलीचे अपडेट्स पाठवून सर्वांना प्रवासात सामील करून घेतले. विशेष म्हणजे गवी आणि आप्तेष्ट हे प्रत्येक सण, उत्सव प्रत्येकाच्या घरी एकत्रित येऊन साजरे करतात. तब्बल 55 जणांचे आप्तेष्ट असलेले हे कुटुंब प्रत्येक छोट्या-मोठ्या कार्यक्रमात एकत्रित येतात हे आजच्या काळातील विभक्त कुटुंब असूनही एकत्रित वावरण्याचे उत्तम उदाहरण आहे.
या प्रवासाची सुरुवात बेळगाव रेल्वे स्थानकावरून झाली. तेथून रेल्वेने बेंगळूरुला पोहोचल्यानंतर त्यांनी विमान पकडले. बेंगळूरुहून चेन्नईमार्गे विमानाने हैदराबादकडे प्रस्थान केले. आकाशात झेपावताना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, मनातील भीती आणि उत्सुकता विलक्षण होती.. हैदराबादमध्ये त्यांनी रामोजी फिल्मसिटी, ऐतिहासिक चारमिनारसह अनेक प्रेक्षणीय स्थळांना भेटी दिल्या. तेथील प्रत्येक क्षणाचा अनुभव त्यांनी मनसोक्त लुटला.
हैदराबादहून परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आणि ते हुबळीला पोहोचले. हुबळीतील प्रसिद्ध मठ आणि इतर स्थळांना भेट दिल्यानंतर त्यांची सहल पूर्ण झाली. या ज्येष्ठ मंडळींपैकी काहीजण शेतकरी आहेत. सातत्याने शेतीच्या कामात व्यस्त असलेल्या या मंडळींनी केवळ विरंगुळा म्हणून नाही, तर एकमेकांसोबत सहलीचा आनंद घेण्यासाठी हे खास नियोजन केले होते. कामातून विश्रांती घेऊन त्यांनी आयुष्यातील सर्वात सुंदर आणि अविस्मरणीय क्षण एकत्र घालवले.
या प्रवासाने हे पुन्हा एकदा सिद्ध केले की, ‘वय’ हा केवळ एक आकडा आहे आणि आयुष्यात आनंद मिळवण्यासाठी किंवा स्वप्नं पूर्ण करण्यासाठी ती मर्यादा ठरू शकत नाही. या भावंडांनी एकत्र येऊन भरलेली ही ‘भरारी’ केवळ आकाशातील नव्हती, तर ती त्यांच्या नात्यातील गोडव्याची आणि चिरंतन स्मृतींची होती. ही सहल संपली असली तरी, तिच्या आठवणींचा गोडवा कायम त्यांच्या मनात दरवळत राहील आणि इतरांनाही नव्या स्वप्नांसाठी प्रेरणा देत राहील.




