बेळगाव लाईव्ह :कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने योग्य नियोजन करून यंदाच्या श्री गणेशोत्सवासह श्री विसर्जन मिरवणूक निर्विघ्न पार पाडण्यात सिंहाचा वाटा उचलल्याबद्दल आजी-माजी मराठी नगरसेवकांकडून शहर पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांचा आज खास सत्कार करण्यात आला.
बेळगाव महापालिकेच्या शहापूर प्रभाग क्र. 27 चे महाराष्ट्र एकीकरण समितीचे नगरसेवक रवी साळुंके यांच्या नेतृत्वाखाली आजी-माजी मराठी नगरसेवकांनी आज शुक्रवारी सकाळी बेळगाव पोलीस आयुक्तालयाला भेट दिली. या भेटीप्रसंगी त्यांनी पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचा श्री गणेशोत्सवासह श्री विसर्जन मिरवणूक निर्विघ्न पार पाडण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
याप्रसंगी पोलीस आयुक्तालयाबाहेर बेळगाव लाईव्हशी बोलताना नगरसेवक रवी साळुंके यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना शहर पोलीस आयुक्तांच्या सत्काराचा उद्देश स्पष्ट केला. श्री गणेशोत्सवाच्या 11 दिवसांच्या कालावधीत पोलीस प्रशासनाने अतिशय कर्तव्यदक्षतेने कोणतीही अनुचित घटना घडणार नाही गालबोट लागणार नाही या पद्धतीने प्रशासनीय कार्य केले आहे. शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्या कुशल व समर्थ नेतृत्वामुळेच श्री गणेशोत्सव शांततेत सुरळीत पार पडला आहे.
यंदा श्री गणेश विसर्जन मिरवणूक दरवर्षीपेक्षा जास्तच लांबली असली तरी कोणत्याही पोलीस अधिकारी अथवा कर्मचाऱ्याने सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते अथवा गणेश भक्तांवर कोणताही दबाव न आणता अतिशय उत्तम प्रकारे सहकार्य केले आहे.
याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे आपल्या सर्वांचे कर्तव्य बनत असल्यामुळे समस्त गणेश भक्तांच्यावतीने आम्ही आजी-माजी मराठी नगरसेवकांनी आज पोलीस प्रशासनाचे आयुक्त बोरसे यांचा सत्कार करून आभार मानले आहेत, असे नगरसेवक रवी साळुंके यांनी सांगितले.




