जय किसान भाजी मार्केटचे कामकाज ताबडतोब थांबवण्याची मागणी

0
2
 belgaum

बेळगाव लाईव्ह :जय किसान घाऊक भाजीपाला व्यापारी संघटनेचा परवाना व्यापारी परवाना रद्द करण्याच्या सरकारच्या आदेशांची त्वरित अंमलबजावणी करावी. तसेच या व्यापारी संघटनेद्वारे चालवल्या जाणाऱ्या खाजगी भाजीपाला मार्केटचे सर्व कामकाज ताबडतोब थांबवावे. कर्नाटक एपीएमसी कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल बाजार व्यवस्थापन आणि व्यापाऱ्यांविरुद्ध आवश्यक दंडात्मक कारवाई करून शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करावे, अशी मागणी शेतकरी नेते सिद्धगौडा मोदगी, चन्नाप्पा पुजारी आणि बेळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

जय किसान घाऊक भाजीपाला व्यापारी संघटनेच्या विरोधात आज मंगळवारी सकाळी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय आवारामध्ये मोठ्या संख्येने जमलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतकरी नेते सिद्धगौडा मोदगी व चन्नाप्पा पुजारी यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी निवेदनाचा स्वीकार करून शेतकऱ्यांच्या मागणीच्या अनुषंगाने कार्यवाही सुरू असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपली कृषी उत्पादनांचा स्वयंस्फूर्तीने बेळगाव एपीएमसी भाजी मार्केटमध्ये खरेदी-विक्री व्यवहार करावा असे आवाहन केले. निवेदन सादर करण्यापूर्वी उपस्थित बहुसंख्य पुरुष व शेतकरी महिलांनी धरणे आंदोलनासह निदर्शने केली.

कर्नाटक सरकारने 15-9-2025 रोजीच्या कृषी पणन संचालकांमार्फत कर्नाटक कृषी उत्पन्न पणन नियमन आणि विकास कायदा 1966 च्या कलम 72 ड अंतर्गत जय किसान घाऊक भाजीपाला व्यापारी संघटनेचा परवाना रद्द केला आहे. अनाधिकृत वास्तूंमध्ये व्यापार करणे, शेतकऱ्यांकडून बेकायदेशीरपणे कमिशन वसूल करणे आणि परवाना देताना दिलेल्या नोंदी आणि सुविधा राखण्यात अपयश येणे यासह नियमांचे सतत उल्लंघन केल्यामुळे हा आदेश देण्यात आला आहे.

 belgaum

सरकारी आदेशानुसार, आपण एक परिणामात्मक आदेश देखील जारी केला आहे. ज्यामध्ये परवाना रद्द करण्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि कायद्याचे पालन करून खाजगी भाजीपाला बाजाराचे कामकाज बंद करण्यासाठी संबंधित विभागांशी सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. तथापी कर्नाटक सरकार आणि जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशांनंतरही, सदर खाजगी भाजीपाला बाजाराचे व्यापारी आणि व्यवस्थापन त्यांचे व्यवसाय सुरू ठेवून बेकायदेशीरपणे अप्रत्यक्षपणे वैधानिक आदेशांचे उल्लंघन करत आहेत.

यामुळे सरकारच्या अधिकारालाच धक्का बसत नाही तर निष्पक्ष आणि पारदर्शक बाजार पद्धतींपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचे शोषण होत असून त्यांना त्रास होत आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन 15-9-2025 रोजी कृषी पणन संचालक आणि तुमच्या कार्यालयाने दिलेला व्यापारी परवाना रद्द करण्याचा आदेश तात्काळ लागू करावा आणि जय किसान घाऊक भाजीपाला व्यापारी संघटनेद्वारे चालवल्या जाणाऱ्या खाजगी भाजीपाला मार्केटचे सर्व कामकाज थांबवावे. कर्नाटक एपीएमसी कायदा 1966 च्या कलम 72 ड आणि 78 चे उल्लंघन केल्याबद्दल बाजार व्यवस्थापन आणि व्यापाऱ्यांविरुद्ध आवश्यक दंडात्मक कारवाई सुरू करावी आणि शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करावे, अशा आशयाचा तपशील जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात नमूद आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.