belgaum

तज्ञ समितीच्या अध्यक्षांकडे युवा समिती सीमाभागची विविध विषयावर मागणी

0
30
 belgaum

बेळगाव लाईव्ह : मुंबई येथील मंत्रालयात कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्न तज्ञ समितीच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी गेलेल्या युवा समिती सीमा भाग च्या शिष्टमंडळाने कर्नाटक सरकार व प्रशासनाकडून सीमावासीयांवर कन्नड सक्ती, होणारे भाषिक अत्याचार व दाखल होणारे विविध खोटे गुन्हे यावर लक्ष केंद्रित करणे बाबत या विषयावर तज्ञ समितीचे अध्यक्ष खासदार धैर्यशील माने यांना पत्र देऊन मागणी केली आहे. बैठकीवेळी सीमा प्रश्न तज्ञ समितीचे  सह अध्यक्ष खासदार धनंजय महाडिक, मंत्री चंद्रकांत दादा पाटील , माजी सनदी अधिकारी दिनेश ओऊळकर वकील महेश बिर्जे, समितीने नेते रमाकांत कोंडुसकर, निपाणी समितीचे जयराम मिरजकर महाराष्ट्र शासनाचे अधिकारी उपस्थित होते.

बेळगावसह सीमाभागातील मराठी माणूस हा गेली सत्तर वर्षे येथील कर्नाटक सरकार व प्रशासनाकडून होणाऱ्या भाषिक अत्याचाराचा बळी ठरत आला आहे, कर्नाटकी प्रशासनाकडून फक्त कन्नड भाषेची सक्ती केली जाते असं नाही, तर लोकशाही मार्गाने दिलेले भाषिक हक्क डावलून येथील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेते व कार्यकर्त्यांवर येनकेण प्रकारे गुन्हे दाखल केले जातात, काही तथाकथित कन्नड संघटनांच्या दबावाला बळी पडत  मराठी भाषिकांत एक प्रकारची दहशत निर्माण करण्याचं काम जाणीवपूर्वक सुरू असून कुठेना कुठे सीमालढ्यात सक्रिय असणाऱ्या कार्यकर्त्यांना वेठीस धरले जात आहे असेही युवा समिती सीमा भागने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

परवाच झालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीत जय जय महाराष्ट्र गीत लावल्याचा ठपका ठेवत दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच बेळगाव महानगर पालिकेच्या सभागृहात मराठीची मागणी केली म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नगरसेवकांचे सभासदत्व रद्द करण्याचा हालचाली सुरू केल्या आहेत.तसेच बेंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या मूर्तीवर शाईफेक करून विटंबना केली होती म्हणून शिवभक्तांनी बेळगाव येथे त्या समाज कंटकांचा निषेध करून निदर्शने केली यासाठी त्यांचेवर विविध गुन्हे दाखल करत त्यांना चाळीस ते पंचेचाळीस दीवस तुरुंगवसात पाठविण्यात आले, यावर न थांबता शिवभक्त युवकांना रौडी शीट ( हिष्टरी शिटर) यादीत टाकण्यात आले व प्रत्येक सणवारच्या दरम्यान त्यांना गंभीर गुन्हेगाराची वागणूक देत नोटिसा पाठविल्या जातात असेही धैर्यशील माने यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

 belgaum

या अन्यायाच्या विरोधात आवाज उठविल्याने,समाज माध्यमावर व्यक्त झाल्याने महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते व युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष श्री.शुभम शेळके यांना हद्दपारीची नोटीस बजावण्यात आली व गुन्हे दाखल करण्यात आले.तसेच डिसेंबर 2022 मध्ये केंद्रीय गृहमंत्री श्री अमित शहा यांनी सीमाभागात शांतता राहावी म्हणून दोन्ही म्हणजेच महाराष्ट्र व कर्नाटक सरकारचे तीन तीन समन्वक मंत्र्यांची समिती नेमली होती, पण त्याची अंमलबजावणी झाली नाही किंबहुना त्या समितीची एकही बैठक झाली नाही व कुठली ठोस कार्यवाही ही झाली नाही, त्यामुळे येथील भाषिक अत्याचार दिवसेंदिवस वाढतच चाललेले आहेत अशीही माहिती देण्यात आली आहे.

तसेच संपूर्ण हिंदू समाजाचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दलही कर्नाटकातील विविध लाल पिवळ्या रंगाचा आयडी वरून बदनामी केली जाते, व शिवरायांच्या बद्दल घाणेरड्या प्रकारच्या कमेंट केल्या जातात, यावर तक्रार करूनही कर्नाटकी सरकार व प्रशासन कोणतीच कारवाई करीत नाही, उलट त्यांना पाठीशी घालण्याचं काम केलं जातंय आणि त्यातूनच ह्या विकृत वृत्तीच्या संघटना फोफावत चाललेल्या आहेत, त्यासाठी आपण महाराष्ट्रातून समाज माध्यमावरील आशा पेजवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी करण्यात आली आहे.

केंद्रीय भाषिक अल्पसंख्यांक आयोगाचे आयुक्त बेळगावात आले तेंव्हा बेळगावचे जिल्हाधिकारी तसेच मध्यवर्ती समिती व मराठी भाषिकां बरोबर बैठक घेऊन आमच्या मागण्यांची पूर्तता करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांना देऊन गेले तशा आशयाचे पत्र सुद्दा येथील प्रशासनाला पाठविले, पण आम्हां मराठी भाषिकांच्या मागण्यांची पूर्तता ही कागदावरतीच राहिली.

बेळगावप्रश्नी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे, यासाठी तज्ञ समितीने लवकरात लवकर ठोस पावले उचलावीत व खटला सर्वोच्च न्यायालयाच्या पटलावर आणावा व सिमावासीयांना न्याय द्यावा सर्व प्रकारात आपण लक्ष घालून सीमाभागातील मराठी भाषिकांवर होणारे अन्याय व अत्याचार थांबविण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती करण्यात आली आहे.यावेळी  शुभम शेळके अशोक घगवे, राजू पाटील, सूरज जाधव, साईराज कुगजी, दिगंबर खांबले आदी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.