बेळगाव लाईव्ह :डीजीजीआय बेळगाव झोनल युनिटने सुमारे 145 कोटी रुपयांच्या बनावट जीएसटी इनव्हॉइस जारी करून 43 कोटी रुपयांच्या कर चोरीशी संबंधित फसवणूक उघडकीस आणली आहे.
मालमत्ता व सेवाकर गुप्तचर महासंचालनालय (डीजीजीआय), बेळगाव झोनल युनिटने अंदाजे 145 कोटी रुपयांच्या बनावट इनव्हॉइस जारी करून करण्यात आलेली जीएसटी फसवणूक उघडकीस आणली असून याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
बनावट इनव्हॉइसद्वारे सुमारे 43 कोटी रुपयांची कर चोरी झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. प्राथमिक निष्कर्षांवरून असे दिसून आले आहे की, अटक केलेल्या बेंगलोर येथील संशयिताने बनावट कागदपत्रांचा वापर करून बनावट जीएसटी नोंदणी तयार केल्या आणि बनावट आयटीसी मिळवून इतरांना दिला.
आरोपीच्या जागेची झडती घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी अनेक कागदपत्रे व पुरावे जप्त केले. जप्त केलेल्या साहित्यामध्ये एक मोबाइल फोन, बनावट कागदपत्रे, बनावट आधार कार्ड आणि नॉन-फंक्शनल युनिट्सच्या साइनबोर्डचे फोटो यांचा समावेश आहे.
तपासात पुढे असे दिसून आले आहे की कोणतीही कंपनी अस्तित्वात नसताना केवळ कागदपत्रांमध्ये फेरफार करत बनावट इनव्हॉइस आणि ई-वे बिल तयार करण्यात आले. आरोपीला बेंगलोर येथे सीजीएसटी कायदा, 2017 च्या कलम 69 अंतर्गत अटक करून आर्थिक गुन्हे विभागाच्या बेंगलोर येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले.
त्या न्यायालयाने आरोपीला बेळगाव येथे हस्तांतरित करण्यासाठी ट्रान्झिट रिमांड मंजूर केला. त्यानंतर बेळगाव येथील चतुर्थ जेएमएफसी न्यायालयासमोर त्याला हजर केले असता त्याला 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सदर प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.


