बेळगाव लाईव्ह : व्यापारी परवाना रद्द करण्यात आल्यामुळे जय किसान खाजगी होलसेल मार्केट मधील व्यापाऱ्यांना सध्या तरी त्या ठिकाणी भाजी विक्री करता येणार नाही. परंतु त्यांनी अन्यत्र भाजीपाला विक्री करण्यासाठी आमचा कोणताही आक्षेप नाही. त्याचप्रमाणे कृषी क्षेत्रावर किंवा शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये हीच आमची भावना आहे आणि आम्ही तसा अन्याय होऊ देणार नाही, असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आज स्पष्ट केले.
व्यापारी परवाना रद्द झालेल्या जय किसान भाजी मार्केटच्या समर्थनार्थ असंख्य शेतकऱ्यांनी आज बुधवारी सकाळी सदर जय किसान भाजी मार्केटच्या आवारात जमून जोरदार निदर्शने केली. निदर्शने करणाऱ्या या शेतकऱ्यांची भेट घेतल्यानंतर जिल्हाधिकारी प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते. यावेळी पोलीस आयुक्त भूषण बोरसे कृषी अधिकारी उपस्थित होते रोशन यांनी सांगितले की, शहरातील व्यापारी परवाना रद्द झालेल्या जय किसान खाजगी होलसेल भाजी मार्केटला पाठिंबा देऊन निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेऊन मी त्यांच्याशी चर्चा केली.
या शेतकऱ्यांच्या दोन मागण्या असून त्यापैकी पहिली म्हणजे शेतकऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा दबाव आणला जाऊ नये. त्यांना इथे जाऊन तुमच्या भाजीपाला विका अथवा तिथे जाऊन खरेदी करा, असा दबाव आणू नये. आम्ही इथे आमच्या मालाची विक्री करणार नाही. परंतु एपीएमसी मध्येच जा किंवा ठराविक ठिकाणीच तुमच्या उत्पादनाची विक्री करा असा आग्रह किंवा असे दडपण कोणी आणू नये. आम्ही आमचा माल कोठेही विकण्यास स्वतंत्र्य आहोत, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
यासंदर्भात जिल्हा प्रशासनाच्यावतीने मी काल रात्रीच स्पष्टीकरण दिली आहे की, शेतकरी अथवा कृषी क्षेत्रावर कोणताही अन्याय होऊ देणार नाही. कोणतेही भाजी मार्केट सील करण्यात आलेले नाही. जय किसान भाजी मार्केट बंद करण्याचा आदेश असल्यामुळे आम्हाला ते बंद करावे लागले आहे. परंतु आम्ही हे मार्केट सीज केलेले नाही किंवा आतल्याही कुठल्याही आस्थापन -दुकान गाळ्यांना टाळे ठोकलेले नाही. जय किसान होलसेल भाजी विक्रेत्या संघटनेचे पदाधिकारी न्यायालयात जाण्यास स्वतंत्र आहे.
त्याच्याबद्दलही आमचा आक्षेप नाही. व्यापारी परवाना रद्द झाल्यामुळे सध्या त्यांनी या ठिकाणी व्यापार करणे हे कायद्याचे उल्लंघन ठरते. कृषी क्षेत्रावर किंवा शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये हीच आमची भावना आहे आणि आम्ही तसा अन्याय होऊ देणार नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
जय किसान होलसेल भाजी मार्केट पुन्हा सुरू करावे अशी शेतकऱ्यांची दुसरी मागणी आहे. त्यासंदर्भात आज संध्याकाळी जय किसान होलसेल भाजी विक्रेते संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत माझी बैठक होणार आहे. या बैठकीत कायद्याच्या चौकटीत कोणता तोडगा निघू शकतो का हे पाहिले जाईल.
मी त्यांना असे सुचवले आहे की सध्या एपीएमसीमध्ये 150 गाळे रिकामे असून तेथे त्यांनी व्यापार करण्यास हरकत नाही. मात्र सध्या तरी जय किसान मार्केटमध्ये त्यांना व्यापार करता येणार नाही. तथापि याबाबत योग्य तो तोडगा काढण्यासाठी माझा प्रयत्न सुरू असून त्यासाठीच संध्याकाळी या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.




