बेळगाव लाईव्ह :सध्या सुरू असलेल्या भाजीपाला व्यापारी व शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे रस्ता अडवला जाऊन सर्वसामान्यांना मोठा त्रास होत आहे. तेंव्हा हा रस्ता रिकामी करून आमच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे या, सायंकाळी पर्यंत तुम्हाला योग्य तोडगा काढून देण्याचा यथाशक्ती प्रयत्न करेन, असे आश्वासन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिले.
शहरातील जय किसान खाजगी होलसेल भाजी मार्केटच्या समर्थक व्यापारी व शेतकऱ्यांनी परवा मंगळवारी मोर्चा काढल्यानंतर आज गुरुवारी सकाळी एपीएमसी भाजी मार्केटच्या समर्थक शेतकरी व व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. यावेळी भर पावसात उपस्थित शेतकऱ्यांसमोर बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी उपरोक्त आश्वासन दिले.
जिल्हाधिकारी रोशन म्हणाले की, शेतकऱ्यांप्रमाणे मी देखील गेल्या आठ दिवसापासून रस्त्यावरच आहे, ही परिस्थिती निर्माण व्हायला नको होती. आज सकाळपासून ऊन होतं परंतु त्यामुळे शेतकऱ्यांना त्रास होईल म्हणून पावसाने आशीर्वाद दिला आहे. गेल्या आठ दिवसापासून प्रशासन फक्त शेतकऱ्यांचेच काम करत आहे.
शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे त्रास होऊ नये याचाच आम्ही प्रयत्न करत आहोत. दोन्ही गटांकडून आमच्यासमोर वाद -विवाद, विरोध -प्रतिविरोध केला जात आहे. तथापि मी असू दे किंवा पोलीस आयुक्त असू दे आम्ही दोघेही कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याचा प्रयत्न करत आहोत. कायद्यानुसार तुम्ही जे म्हणणे तुम्ही मांडले त्याच्यावर मी आता कार्यालयात जाऊन योग्य तो निर्णय घेईन.
दुसरी गोष्ट म्हणजे माझी एकच विनंती आहे की आता दुपारी इथं रस्त्यावर बसून जेवण करू नका. माझ्या जिल्हाधिकारी कार्यालय आवारात प्रशस्त जागा आहे तेथे बसून जेवण करा. सार्वजनिक रस्ते अडवणे योग्य नाही. काल आणि परवा रस्त्यावर शेतकऱ्यांच्या पंगती बसल्यामुळे सर्वसामान्य जनतेला प्रचंड त्रास झाला आहे. येथून जवळच हॉस्पिटल असून तेथील रुग्णाला देखील त्रास होतो.
तेव्हा कृपया हा रस्ता रिकामी करून आमच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे या मी अवघ्या 6 तासात तुम्हाला योग्य तोडगा काढून देण्याचा यथाशक्ती प्रयत्न करेन असे आश्वासन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिले. याप्रसंगी शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे हे देखील उपस्थित होते.



