बेळगाव लाईव्ह :महापौर मंगेश पवार आणि नगरसेवक जयंत जाधव यांच्यावर मिळकतीची माहिती लपविल्याचा ठपका ठेवून प्रादेशिक आयुक्तांनी बजावलेल्या कारणे दाखवा नोटीसीच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणी लांबणीवर पडली असून ती आता येत्या 10 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
प्रादेशिक आयुक्त जानकी यांनी महापालिका कायद्यातील कलम 19 अंतर्गत गेल्या 26 ऑगस्ट रोजी महापौर पवार व नगरसेवक जाधव यांना मिळकतीची माहिती लपविल्याचा ठपका ठेवत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
त्या नोटीसीला महापौर पवार व नगरसेवक जाधव यांनी उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठात आव्हान दिले आहे. त्यांच्या याचिकेवर गेल्या 23 सप्टेंबर रोजी सुनावणी झाली. त्यावेळी प्रतिवादी असलेल्या राजीव टोपण्णावर यांच्या वकिलांकडून युक्तिवाद करण्यात आला. वादी व प्रतिवादींच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने येत्या 10 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी लांबणीवर टाकली आहे.
महापौर मंगेश पवार व नगरसेवक जयंत जाधव यांनी मिळकतीची माहिती लपविल्याची लेखी तक्रार सामाजिक कार्यकर्ते राजीव टोपण्णावर यांनी जुलै महिन्यात महापालिका आयुक्त शुभा बी. यांच्याकडे केली होती.
या तक्रारीवर कार्यवाही करण्याचा अधिकार नसल्यामुळे आयुक्तांनी ती तक्रार पुढील कारवाईसाठी प्रादेशिक आयुक्तांकडे पाठवली होती. प्रादेशिक आयुक्त जानकी यांनी लागलीच या तक्रारीची दखल घेत महापौर पवार व नगरसेवक जाधव यांना नोटीस बजावून नोटीसीला उत्तर देण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली होती. त्यानंतर पुन्हा सात दिवसांची वाढीव मुदत देण्यात आली होती.
तथापि नोटीसीला उत्तर देण्याऐवजी महापौर मंगेश पवार आणि नगरसेवक जयंत जाधव यांनी प्रादेशिक आयुक्तांच्या नोटिसीला न्यायालयात आव्हान दिले आहे. या नोटीसी वरील कार्यवाहीला स्थगिती मिळावी अशी त्यांची मागणी आहे.



