बेळगाव लाईव्ह : आता राज्यभरातील सर्व सरकारी, निम-सरकारी आणि सेवा संस्थांच्या इमारतींवर चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक १०९८ लिहिणे अनिवार्य आहे, यासंदर्भात सरकारच्या मुख्य सचिवांनी यासंदर्भात निर्देश जारी केले आहेत.
‘मिशन वात्सल्य’ योजनेअंतर्गत मुलांच्या हक्कांचे संरक्षण आणि विकासाला प्राधान्य दिले जात आहे. या योजनेचा उद्देश संकटात असलेल्या मुलांची ओळख पटवणे, त्यांना मदत देणे आणि त्यांचे पुनर्वसन करणे आहे. यामध्ये मदत क्रमांक १०९८ महत्त्वाची भूमिका बजावतो.
हा क्रमांक सार्वजनिक ठिकाणी सहज उपलब्ध झाल्यास बालविवाह, बालमजुरी आणि इतर समस्यांमध्ये अडकलेल्या मुलांना तात्काळ मदत मिळू शकेल.
या क्रमांकाचा व्यापक प्रचार केल्याने मुलांचे संरक्षण अधिक प्रभावी होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. काही विभागांनी यापूर्वीच हा क्रमांक इमारतींवर लिहिला आहे, तर काही ठिकाणी योग्य मार्गदर्शनाअभावी हे काम थांबले होते.
त्यामुळे कोणत्याही गोंधळाशिवाय तात्काळ हा क्रमांक इमारतींवर प्रदर्शित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.




