बेळगाव लाईव्ह :पारदर्शकतेसाठी कर्नाटक सरकारकडून जातीनिहाय जनगणती मोहीम हाती घेण्यात आली असली तरी त्यासाठीचा ॲप सदोष असल्यामुळे अनेक कुटुंबांना गणतीपासून वंचित रहावे लागत असल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ योग्य ती कार्यवाही करण्याची जोरदार मागणी केली जात आहे.
सरकारच्या सामाजिक शैक्षणिक व आर्थिक निकषावरील जातीनिहाय जनगणनेसाठी प्राथमिक शाळांच्या शिक्षक -शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर कामासाठी त्यांच्या मोबाईलमध्ये प्रत्येक कुटुंब आणि त्या कुटुंबातील सदस्यांची माहिती असलेला विशिष्ट ॲप डाऊनलोड करण्यात आला आहे. तथापि सध्या जनगणनेसाठी घरोघरी फिरणाऱ्या शिक्षकांच्या त्या ॲपमध्ये बऱ्याच कुटुंबांच्या नोंदीच सापडेनाशा झाल्या आहेत.
घरांच्या आयडी नंबरमध्ये तफावत असल्यामुळे हा प्रकार घडत आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे आज शुक्रवारी सकाळी कपिलेश्वर कॉलनी येथील एका गल्लीतील सुमारे 70 घरांपैकी फक्त एकाच घरातील कुटुंबाची माहिती ॲपवर उपलब्ध झाली आहे. परिणामी उर्वरित 69 घरातील कुटुंब आणि त्यातील सर्व सदस्यांना गणतीपासून वंचित रहावे लागले आहे. या संदर्भात स्थानिक कार्यकर्त्यांनी जनगणतीसाठी आलेल्या शिक्षिकेला जाब विचारला असता.
माझ्याकडे 212 घरातील सदस्यांच्या नोंदणीचे काम देण्यात आले आहे. माझ्या मोबाईलचा ॲप देखील ओपन झाला आहे. परंतु तुमच्या गल्लीतील 70 घरांपैकी एकाच घराचा युएचआयडी नंबर मॅच झाल्यामुळे मी फक्त त्या घरातील सदस्यांची गणती केली आहे. उर्वरित घरांवर लावलेल्या स्टिकर वरील युएचआयडी नंबर माझ्याकडील ॲपमध्ये शोधण्याचा बराच प्रयत्न केला. तथापि ते नंबर मॅच होत नसल्यामुळे मी काही करू शकत नाही. थोडक्यात त्या घरांच्या नोंदीच माझ्याकडील ॲपमध्ये नाहीत, असे त्या शिक्षिकेने स्पष्ट केले.

याप्रसंगी बेळगाव लाईव्ह बोलताना संबंधित सामाजिक कार्यकर्ता म्हणाला की, जनगणनेसाठी नियुक्त शिक्षकांची यामध्ये कांही चूक नाही. कारण तहसीलदारांमार्फत त्यांच्यावर हे काम सोपवण्यात आले आहे. तथापि हे काम व्यवस्थित पार पडण्यासाठी या शिक्षकांना जर आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून दिला नाही तर गणती व्यवस्थितरित्या कशी पार पडणार? आणि गणतीच जर व्यवस्थित झाली नाही तर सामान्य नागरिकांपर्यंत सरकारची सुविधा कशी पोहोचणार? ॲपमध्ये घरांच्या नोंदीच नसण्याची ही समस्या फक्त कपिलेश्वर परिसरातच नव्हे तर संपूर्ण बेळगावातील विविध ठिकाणी, प्रभागांमध्ये उद्भवत आहे.
तेंव्हा तहसीलदार किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी थोडक्यात सरकारने याची गांभीर्याने दखल घ्यावी. तसेच युएचजे ॲप ओपन करताना गणती करणाऱ्या शिक्षकांना ज्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे त्या समस्या लवकरात लवकर दूर कराव्यात आणि या समस्येचा सोक्षमोक्ष लावावा, अशी आमची विनंती आहे.


