बेळगाव लाईव्ह :या ना त्या कारणाने सातत्याने वादग्रस्त ठरणाऱ्या बेळगावच्या सिव्हिल हॉस्पिटल अर्थात बिम्स हॉस्पिटलमध्ये आता आणखी एक खळबळ जनक प्रकार उघडकीस आला आहे. हॉस्पिटलमध्ये एक बनावट पदव्युत्तर (पोस्ट ग्रॅज्युएट) वैद्यकीय विद्यार्थिनी तब्बल सुमारे 3 महिने रुग्णांवर उपचार करत असल्याचे प्रकरण सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे उघडकीस आले आहे.
एक बनावट पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थिनीचे नांव सना शेख असे आहे. कारवारची रहिवासी असणारी सना ही सध्या बेळगाव मधील कुमारस्वामी लेआउट येथे वास्तव्यास आहे. जवळपास 3 महिन्यापासून आपण पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडन्ट असल्याचे भासवत तिचा बिम्स हॉस्पिटल मधील सर्जिकल वॉर्ड, बाह्य रुग्ण विभाग (ओपीडी) यासह इतर सर्व विभागांमध्ये वावर सुरू होता, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.
यादरम्यान रुग्णांवर उपचार करणाऱ्या, सल्ला देणाऱ्या सना शेख हिला हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्यांनी कांही वेळा हटकलेही होते. त्यावेळी तिने त्यांना बिम्सच्या संचालकांचा संदर्भ देऊन धमकावल्याचे कळते. मात्र आज बिम्समधील रुग्णांची वैद्यकीय चिकित्सा करणारी ही बनावट पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थिनी तेथील सुरक्षा रक्षकाच्या तावडीत सापडली.
त्याने लागलीच बिम्स हॉस्पिटलचे सर्जन, आरएमओ संपर्क साधून सना शेख हिची बनावटगिरी त्यांच्या निदर्शनास आणून दिली.








या संदर्भात हॉस्पिटलच्या वरिष्ठांनी सना शेख हिला बोलावून जाब विचारला असता तिने आपण शहरातील अन्य एका खाजगी हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करत असून कांही कामानिमित्त येथे आलो होतो असा खोटा खुलासातीने केल्याचे समजते. दरम्यान या प्रकरणि प्रसिद्धी माध्यमांना प्रतिक्रिया देण्यास बिम्स हॉस्पिटलचे संचालक अशोक शेट्टी यांनी नकार दिला.





