बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यात नैऋत्य मान्सूनचा पाऊस आतापर्यंत सरासरीपेक्षा जास्त पडला आहे. जिल्ह्यात 476 मि.मी. सरासरीच्या तुलनेत 595 मि.मी. इतक्या अधिक पावसाची नोंद झाली असून जो कर्नाटक राज्य नैसर्गिक आपत्ती देखरेख केंद्रच्या (केएसएनडीएमसी) आकडेवारीनुसार जून-ऑगस्ट 2025 या कालावधीसाठी 25 टक्के जास्त आहे.
महिनावार पावसाची नोंद पुढील प्रमाणे आहे. जून 2025 : जिल्ह्यात 146 मि.मी.च्या सरासरीच्या तुलनेत 48 टक्के जास्त म्हणजे 217 मि.मी. पाऊस पडला. जुलै 2025 : 191 मि.मी.च्या तुलनेत 13 टक्के कमी म्हणजे 165 मि.मी. इतका पाऊस पडला. ऑगस्ट 2025 : या महिन्यात 139 मि.मी.च्या सरासरीच्या तुलनेत 54 टक्के जास्त म्हणजे 213 मि.मी. पाऊस पडला.
बेळगाव जिल्ह्यातील तालुक्यांनुसार ठळक मुद्दे जाणून घ्यायचे झाल्यास सर्व तालुक्यांमध्ये पावसाची नोंद असमान राहिली आहे. जिल्ह्यातील कांही क्षेत्रांमधील पावसामध्ये लक्षणीय तूट आहे तर काहींमध्ये मोठ्या प्रमाणात अधिशेष आहे. सर्वाधिक अधिशेष : खानापूरमध्ये 1525 मि.मी. सरासरीच्या तुलनेत पावसाने 26 टक्के जास्त म्हणजे 1915 मि.मी. इतकी आघाडी घेतली आहे. सौंदत्ती आणि यरगट्टी येथे सरासरीपेक्षा अनुक्रमे 76 टक्के आणि 79 टक्के जास्त, तर हुक्केरीमध्ये 52 टक्के अधिक म्हणजे 438 मि.मी. पाऊस झाला आहे.
सर्वाधिक तूट : बैलहोंगलमध्ये 451 मि.मी.च्या तुलनेत 390 मि.मी. इतका 14 टक्के तूटीचा पाऊस पडला आहे. विशेषतः जुलैमध्ये कमी पाऊस वजा 59 टक्के इतकी सर्वात जास्त तूट नोंदवली गेली आहे. बेळगाव तालुक्यातील पावसामध्ये 16 टक्के तूट नोंदली गेली असून या तालुक्यात 935 मि.मी.च्या तुलनेत 787 मि.मी. इतका कमी पाऊस आला आहे.



विशेष करून तो जुलैमध्ये 45 टक्के कमी झाला. कित्तूर येथील पावसामध्येही 11 टक्के तूट नोंदवली गेली आहे, तर मुडलगीमध्ये जुलैमध्ये वजा 92 टक्के ही सर्वात मोठी वैयक्तिक मासिक तूट नोंदली गेली आहे.



