बेळगाव लाईव्ह : बंगळूरू येथील हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज, २७ सप्टेंबर पासून पुढील तीन दिवस उत्तर कर्नाटकातील जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. या संभाव्य अतिवृष्टीमुळे हवामान खात्याने या भागासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे.
२७ सप्टेंबरला उत्तर कर्नाटकातील बिदर, बागलकोट, गदग, कलबुर्गी (गुलबर्गा), कोप्पळ, रायचूर आणि यादगीर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यानंतर, २८ सप्टेंबर रोजी कलबुर्गी, बिदर आणि यादगीर या तीन जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट कायम राहणार आहे, तर बागलकोट, कोप्पळ, रायचूर आणि विजापूर जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
२९ सप्टेंबरसाठी बागलकोट, बेळगाव, बिदर आणि कलबुर्गी जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, किनारपट्टीवरील आणि दक्षिण कर्नाटकातील जिल्ह्यांमध्ये देखील या तीन दिवसांदरम्यान हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे दैनंदिन जीवनात अडथळे येण्याची शक्यता असल्याने, नागरिकांनी या काळात सतर्क राहून सुरक्षितता बाळगावी असे आवाहन करण्यात येत आहे.


