बेळगाव लाईव्ह : कर्नाटक राज्यातील बेळगाव इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (बिम्स) या संस्थेला इंडिया टुडे तर्फे आयोजित “बेस्ट मेडिकल कॉलेज सर्व्हे” मध्ये राज्यात दुसरा क्रमांक मिळाल्याने संस्थेला अभिमान वाटण्यासारखा सन्मान मिळाला आहे.
त्याचबरोबर 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी एमबीबीएस प्रवेश मर्यादा 150 वरून 200 वर वाढवण्यात आली असून हीदेखील संस्थेसाठी आणखी एक अभिमानाची बाब ठरली आहे.
कर्नाटकातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा जिल्हा असलेल्या बेळगावने सर्व क्षेत्रांत मोलाचे योगदान दिले आहे. त्यातील एक भाग असलेली बिम्स संस्था गरीब रुग्णांच्या आरोग्य सेवेत अग्रगण्य असून शैक्षणिक क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी करत आहे.
या कामगिरीची साक्ष म्हणून आता एमबीबीएस सीट वाढ विद्यार्थ्यांसाठी विशेषतः ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण घेण्यास मोठी संधी उपलब्ध करून देणार आहे.
नॅशनल मेडिकल कौन्सिल, नवी दिल्ली यांनी 2025-26 शैक्षणिक वर्षासाठी एमबीबीएस प्रवेशवाढीचा अधिकृत आदेश जारी केला आहे. या यशामागील कारणीभूत ठरलेल्या सर्व प्राध्यापक व अप्राध्यापक कर्मचाऱ्यांचे संस्थेचे अभिमानी संचालक डॉ. अशोककुमार शेट्टी यांनी अभिनंदन केले आहे.





