बेळगाव लाईव्ह :महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी सकल मराठा समाज बेळगावतर्फे काल शहरात भव्य मोर्चा काढून मनोज जरांगे -पाटील यांच्या आंदोलनाला संपूर्ण जाहीर पाठिंबा व्यक्त केल्यानंतर या पाठिंब्याचे पत्र मराठा समाजाचे नेते रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज मुंबई येथील आंदोलनाच्या ठिकाणी जरांगे-पाटील दिले. तसेच मराठा आरक्षणाच्या त्यांच्या लढ्याला सीमाभाग बेळगावातून संपूर्ण पाठिंबा व्यक्त केला.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मुंबई येथे जरांगे -पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काल रविवारी मराठा समाजातर्फे बेळगाव शहरांमध्ये भव्य असा लक्षवेधी मोर्चा काढण्यात आला होता.
त्यानंतर बेळगावातील सकल मराठा समाजाचा पाठिंबा असलेले पत्र जरांगे -पाटील यांना देण्यासाठी काल रात्री ‘चलो मुंबई’चा नारा देत समाजाचे व महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ मुंबईला रवाना झाले होते.





या शिष्टमंडळाने मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन स्थळी पाठिंब्याचे पत्र जरांगे पाटील यांना सादर केले. मनोज जरांगे -पाटील यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांनी पाठिंब्याच्या पत्राचा स्वीकार केला.
मुंबईला रवाना झालेल्या सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळात कोंडुसकर यांच्यासह इतर कार्यकर्ते मोतेश बार्देशकर, अनंत पाटील, कृष्णा पन्हाळकर, अजय खलाटे पाटील, शिवम पन्हाळकर, राजेंद्र बैलूर, विनायक बिर्जे, ओमकार पन्हाळकर, गणेश शिंदोळकर आदींचा समावेश आहे.


