belgaum

बेळगाव मासळी बाजारात बांगड्याची विक्रमी आवक

0
64
 belgaum

बेळगाव लाईव्ह : गोवा, वेंगुर्ला आणि मालवण या किनारपट्टी भागातून आज बेळगावच्या मासळी बाजारात तब्बल ३५ ते ४० टन बांगड्याची आवक झाली आहे. सध्या बांगड्याचा होलसेल दर ६० ते ७० रुपये प्रति किलो इतका आहे. गेल्या दोन-तीन आठवड्यांपासून बेळगावमध्ये जास्तीत जास्त ५० टनांपर्यंत बांगड्याची आवक होत असल्याची माहिती बेळगाव जिल्हा मासे विक्री व्यापारी संघटनेचे अध्यक्ष गिरगोल रॉड्रिक्स यांनी दिली.

दररोज सकाळच्या सत्रात ओल्ड पी बी रोड जुना जनावरांच्या बाजारात मासळीचे मार्केट भरते. कसा आहे गल्ली आणि कॅम्प नंतर ते तिसरे बेळगावचे फिश मार्केट आहे.बांगडा मासा हे बेळगावच्या मासळी मार्केटचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. अत्यंत चविष्ट असल्यामुळे ‘बांगडा’ म्हटले की बेळगावच्या मत्स्यप्रेमींची जीभ चाळवते. गिरगोल रॉड्रिक्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिन्याभरापूर्वी समुद्रातील वादळासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे या माशांची आवक कमी झाली होती आणि दर खूप वाढले होते. मात्र आता बांगड्याचा दर सर्वसामान्य मध्यमवर्गीय लोकांना परवडणारा झाला आहे.

बेळगाव मासळी बाजारासाठी गोवा, वेंगुर्ला, मालवण आणि रत्नागिरी किनारपट्टीवर मासेमारी होते. विशेष म्हणजे ही मासेमारी मोठ्या बोटीतून नव्हे, तर लहान बोटींमधून केली जाते, ज्याला ‘पट्ट्याची किंवा होड्यांची मासेमारी’ असे म्हटले जाते. यासाठी मच्छिमार सायंकाळी ६ वाजता समुद्रात उतरतात आणि रात्री ८ नंतर मासे पकडून परत येतात. वेंगुर्लापासून १०० किमी आणि मालवणपासून सुमारे १५०-१६० किमी अंतरावर बेळगाव असल्याने, पकडलेले ताजे मासे प्रथम बेळगावला पाठवले जातात. दररोज २०-२५ गाड्या भरून बांगडे बाजारपेठेत येतात. प्रत्येक गाडीमध्ये ३०-३० किलो मासे भरलेले जवळपास ३ ते ५ हजार ट्रे किंवा बॉक्स असतात.

 belgaum

बाजारपेठेत बांगड्यांचा दर ५० रुपयांपेक्षा खाली घसरतो, तेव्हा ते मासे खारवण्यासाठी वापरले जातात. मिठात खारवलेला बेळगाव सारखा बांगडा तुम्हाला देशात कुठेही सापडणार नाही. या खारवलेल्या माशांचा मोठा बाजार प्रत्येक शनिवारी बेळगावात भरतो. रॉड्रिक्स म्हणाले की, बांगडा मासा हा ठराविक मोसमातच उपलब्ध होतो आणि त्याच काळात त्याला चांगली चव असते.

बांगडा माशांमध्ये ‘पर्सिनेट’ आणि ‘मिनी पर्सिनेट’ असे दोन-तीन प्रकार आहेत. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवर भरपूर मासेमारी होते, तर कारवार किनारपट्टीवर अलीकडे ती कमी झाली आहे. कारवारमध्ये मोठ्या बोटीने मोठ्या माशांची मासेमारी केली जाते, ज्याला ‘पर्सिनेट फिशिंग’ म्हणतात. याउलट, वेंगुर्ला, मालवण आणि रत्नागिरी किनारपट्टीवर मध्यमवर्गीयांना अनुकूल अशी मासेमारी केली जाते. तेथील मासे बेळगावनंतर हुबळी मासळी बाजारातही उपलब्ध होतात.

बेळगावात उपलब्ध होणाऱ्या माशांपैकी साधारणपणे ९० टक्के मासा बांगडा असतो. याव्यतिरिक्त, २०० ते ३०० रुपये दर असलेली सुरमई, त्यानंतर तारली आणि इतर प्रकारचे मासे विक्रीसाठी उपलब्ध असतात. स्थानिक नदीच्या माशांना (लोकल डॅम फिश) बेळगावात फारशी मागणी नसते. त्यांची आवक जास्तीत जास्त ५ टनांपर्यंत होते, पण मागणी नसल्यामुळे ते परगावी पाठवले जातात. बेळगावात सर्वाधिक पसंती बांगडा माशालाच असते.

या माशांचा मोसम जुलै महिन्याच्या अखेरीस सुरू होऊन मार्च महिन्यापर्यंत चालतो, पण मासेमारी जानेवारीपर्यंत ६-७ महिने होते. दर उतरला की ताजा बांगडा शीतगृहांमध्ये साठवला जातो. रत्नागिरी, गोवा, मंगळूर यांसारख्या ठिकाणी अशी शीतगृहे असून, तेथे साठवलेले गोठवलेले मासे मोसम संपल्यावर इतर ठिकाणी किंवा परदेशात पाठवले जातात. ‘बांगडा’ म्हटलं की ‘बेळगाव’ हे जुन्या काळापासून चालत आलेले समीकरण आहे, असे रॉड्रिक्स यांनी अभिमानाने सांगितले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.