बेळगाव लाईव्ह :जय किसान भाजी मार्केट जवळ आपले कर्तव्य पार पाडत असलेल्या अधिकाऱ्यांना विरोध करून कांही व्यापाऱ्यांनी त्यांच्याशी धक्काबुक्की केल्याच्या काल रात्री घडलेल्या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असून संबंधित व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.
बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय आवारामध्ये आज मंगळवारी सकाळी ते पत्रकारांशी बोलत होते. जिल्हाधिकारी रोशन यांनी सांगितले की, बेळगाव शहरातील जय किसान होलसेल खाजगी भाजी मार्केटचा व्यापार परवाना राज्याच्या कृषी पणन संचालकांनी रद्द केला आहे. त्या संदर्भातील आदेश हाती येताच जिल्हा प्रशासनाच्यावतीने कार्यवाहीला सुरुवात झाली आहे.
तसा आदेश मी जारी केला आहे. व्यापारी परवाना रद्द झालेल्या भाजी मार्केटच्या स्थलांतरासाठी प्रांताधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. शांततेने कोणालाही त्रास होणार नाही या पद्धतीने त्या खाजगी मार्केट मधील व्यवहार बंद करावे लागणार आहेत. याचबरोबर एपीएमसी भाजी मार्केटमध्ये शेतकऱ्यांसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे असून कसे मी माझ्या आदेशात नमूद केले आहे.
यासंदर्भात प्रांत अधिकाऱ्यांनी एपीएमसी सचिवांची भेट घेऊन चर्चा केली आहे. एपीएमसी मधील पार्किंग, पिण्याचे पाणी, शौचालय -स्वच्छतागृह, मालाची चढ-उतार करण्यासाठीची फलाटं वगैरे आवश्यक सोयीसुविधांची पाहणी केली आहे. तसेच आपल्या अहवालात त्यांनी सर्व गोष्टी समाधानकारक आहेत असे नमूद केले आहे. यासाठीच आज मी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की त्यांनी आपली कृषी उत्पादने घेऊन स्वयंस्फूर्तीने एपीएमसी भाजी मार्केटमध्ये खरेदी -विक्री व्यवहार करावेत.

त्याचप्रमाणे व्यापारी परवाना रद्द झालेल्या जय किसान भाजी मार्केटमधील व्यापार यांचे दुकान गाळे तात्काळ स्थलांतरित करणे शक्य नसल्यामुळे त्यासाठी 24 तासांचा कालावधी देण्यात आला आहे. सदर भाजी मार्केट मधील व्यापारी आज माझी भेट घेण्यास येणार आहेत. त्यांच्याशी मी सायंकाळी 5 -5:30 वाजता बैठक करणार असून त्यांना समजावणार आहे. मला विश्वास आहे की संबंधित व्यापाऱ्यांसह शेतकरी बांधव एपीएमसीमध्ये जाऊन आपले व्यवहार पूर्ववत सुरू ठेवतील.
व्यापारी परवाना रद्द जय किसान भाजी मार्केटजवळ राष्ट्रीय महामार्गावर कर्तव्य बजावत असलेले सरकारी अधिकारी आणि भाजी मार्केटमधील व्यापारी यांच्या काल सोमवारी रात्री खडाजंगी उडून अधिकाऱ्यांच्या कामात अडथळा आणला होता. या संदर्भात बोलताना सरकारी अधिकाऱ्यांना त्यांचे कर्तव्य पार पाडण्यात, थोडक्यात सरकारी कामात अडथळा आणणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.
काल सोमवारी रात्री जय किसान भाजी मार्केट जवळ आपले कर्तव्य पार पाडत असलेल्या अधिकाऱ्यांना विरोध करून कांही व्यापाऱ्यांनी त्यांच्याशी धक्काबुक्की केल्याची तक्रार आहे. सदर घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असून संबंधित व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल यात शंका नाही, असे स्पष्ट करून जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी जिल्ह्यातील पीक नुकसान भरपाईबद्दल पत्रकारांना माहिती दिली.


