बेळगाव लाईव्ह :शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि संपर्क सुधारण्यासाठी 7.8 कि.मी. लांबीच्या उड्डाणपूलाच्या बांधकामामुळे बेळगावला पायाभूत सुविधांमध्ये मोठी वाढ मिळणार आहे.
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी हा प्रकल्प सार्वजनिक बांधकाम खाते (पीडब्ल्यूडी) आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) यांच्या संयुक्त विद्यमाने हाती घेतला जात असल्याची पुष्टी केली. पुलाच्या एकूण लांबीपैकी सुमारे 6.67 कि.मी. पुल पीडब्ल्यूडीच्या राष्ट्रीय महामार्ग विभागांतर्गत बांधला जाईल, तर 1.12 कि.मी. एनएचएआयच्या अखत्यारीत येईल.
प्रस्तावित उड्डाणपूल अशोका सर्कल, संगोळ्ळी रायन्ना सर्कल, राणी चन्नम्मा सर्कलसह प्रमुख ठिकाणी (जंक्शन्स) जोडेल आणि धर्मवीर संभाजी महाराज सर्कलपर्यंत विस्तारेल. “बेंगलोर आणि दिल्लीतील मेट्रो उड्डाणपुलांप्रमाणेच, या पुलाखालील व्यावसायिक क्रियाकलापांना अडथळा येणार नाही.
दुकानांचे साइनबोर्ड अर्थात नामफलक दिसतील याची खात्री करण्यासाठी उड्डाणपुलाची सरासरी उंची 9.5 ते 13 मीटर असेल,” असे जिल्हाधिकारी रोशन यांनी सांगितले.









या नव्या उड्डाण पुलामुळे राष्ट्रीय महामार्गावरून शहरात थेट प्रवेश मिळणार असल्याने सध्याचे सेवा रस्त्यांवरील अवलंबित्व कमी होईल. यामुळे बेळगावहून धारवाड, कोल्हापूर आणि सांबरा विमानतळाकडे सहज प्रवास करता येईल. या प्रकल्पाचे नियोजन गेल्या 7 महिन्यांपासून सुरू असून ज्यामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री, वरिष्ठ अभियंते, स्थानिक आमदार आणि लोकप्रतिनिधींचा सक्रिय सहभाग आहे.
आराखडा तयार करतेवेळी नागरिकांच्या अभिप्रायाचाही विचार करण्यात आला. उड्डाणपुलाची अंदाजे किंमत 260 कोटी रुपये असून राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाने या प्रकल्पासाठी आधीच 200 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. “हा प्रकल्प उत्तर कर्नाटकातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या शहरांपैकी एक असलेल्या बेळगावच्या रस्ते पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी आणि वाहतूक सुलभ करण्यासाठी एक मोठे पाऊल आहे,” असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी शेवटी स्पष्ट केले.





