बेळगाव लाईव्ह : अथणी तालुक्यातील निपाणी येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीला ३० वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. बेळगाव येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने हा निकाल दिला असून, आरोपीला १० हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
निपाणी शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार, आरोपी आकाश उर्फ अक्षय महादेव साळुंखे (वय ३२, रा. बुद्ध नगर, ता. निपाणी) याने १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एच. डी. मुल्ला यांनी गुन्हा दाखल केला होता. पोलीस निरीक्षक सत्यनायक यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात आरोपपत्र सादर केले.
अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, विशेष जलदगती न्यायालय-११, बेळगाव येथे या प्रकरणाची सुनावणी झाली. न्यायाधीश सी. इंदू सुष्पलथा यांनी ६ साक्षीदार, ३२ कागदपत्रे आणि ९ पुराव्यांच्या आधारे आरोपीला दोषी ठरवले. त्याला ३० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आणि १० हजार रुपयांचा दंड ठोठावला.
याशिवाय, पीडित मुलीला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून ४ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. ही रक्कम एका राष्ट्रीयकृत बँकेत ५ वर्षांसाठी ‘मुदत ठेव’ म्हणून ठेवण्यात येणार आहे. या प्रकरणात सरकारी वकील एल. व्ही. पाटील यांनी शासनाच्या वतीने बाजू मांडली.


