बेळगाव लाईव्ह :बेळगाव कॅन्टोन्मेंट हद्दीतील सर्व्हे क्र. 129 मधील धोबी घाट येथे तलाव बांधण्याच्या नाविन्यपूर्ण प्रकल्पासाठी बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाला राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठेच्या स्कोच रौप्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
नवी दिल्ली येथे आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात उपरोक्त पुरस्कार स्कोच ग्रुपचे चेअरमन समीर कोचर यांच्या हस्ते बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डला प्रदान करण्यात आला.
स्कॉच हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार स्थानिक स्वराज्य संस्थांना सामाजिक कार्यासाठी प्रदान केला जातो. कॅन्टोन्मेंट क्षेत्रातील पाणी टंचाईच्या वाढत्या समस्येवर मात करण्यासाठी धोबी घाट येथे हाती घेतलेल्या तलाव प्रकल्पामुळे एका मोठ्या कचराकुंडाचे शाश्वत जलसाठा आणि हरित क्षेत्रामध्ये यशस्वीरित्या रूपांतर झाले आहे. नव्याने तयार झालेल्या या तलावाची पाणी साठवण क्षमता 2.13 कोटी लिटर असून यामुळे 6,966 चौरस मीटर पाणलोट क्षेत्राचे पुनरुज्जीवन झाले आहे. बेळगाव मराठा रेजिमेंट सेंटरचे ब्रिगेडियर आणि कॅन्टोन्मेंट बोर्ड चे अध्यक्ष जॉयदीप मुखर्जी आणि तत्कालीन कॅन्टोन्मेंट सीईओ राजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रोजेक्ट राबविण्यात आला होता. कॅन्टोन्मेंट चे अभियंते सतीश मनुरकर अधिकाऱ्यांनी या पुरस्काराचा स्वीकार केला.
या तलावामुळे भूजल पुनर्भरण 6.8 टक्क्याने सुधारले आहे. परिणामी हा तलाव घरगुती वापरासाठी आणि सिंचनासाठी पाण्याचा एक विश्वासार्ह स्रोत प्रदान करतो. त्याचबरोबर तलाव परिसर जैवविविधता वाढणारे आणि सामुदायिक मनोरंजनाचे ठिकाण बनत आहे.

कॅन्टोन्मेंट आणि आसपासच्या 25,000 हून अधिक रहिवाशांना या प्रकल्पाचा थेट फायदा होत आहे. सदर तलावाच्या स्वरूपात शाश्वत शहरी जल व्यवस्थापनाच एक उदाहरण निर्माण झाले आहे.
या तलावासाठी बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाला राष्ट्रीय स्तरावर मिळालेला प्रतिष्ठित स्कोच रौप्य पुरस्काराच्या स्वरूपातील सन्मान हा बेळगावसाठी अभिमानाचा क्षण असून जेथे स्थानिक उपक्रम समाजाच्या गरजा पूर्ण करताना पर्यावरणीय आव्हानांना कसे तोंड देऊ शकतात हे पाहायला मिळते.




