(जागतिक हृदय दिनानिमित्त विशेष) बेळगाव लाईव्ह : आजच्या धकाधकीच्या जीवनात तरुण पिढी आरोग्याकडे साफ दुर्लक्ष करत असल्याने अनेक रोगांना निमंत्रण मिळत आहे. याच बेफिकिरीमुळे युवा पिढीला विविध व्याधींचा विळखा बसला असून, ऐन तारुण्यात हृदयरोगाला सामोरे जावे लागत आहे. म्हणूनच, तरुण पिढीने आपल्या आरोग्याकडे लक्ष देऊन आपले हृदय जपण्याची आवश्यकता आहे.
२९ सप्टेंबर रोजी जागतिक हृदय दिन साजरा होतो. यावर्षी ‘एकही ठोका चुकवू नका’ (‘Use Heart, Know Heart’) ही थीम आहे. युवा पिढीने व्यायामाचा अभाव, बैठी जीवनशैली, व्यसनाधीनता, अवेळी जेवणे आणि जंक फूडचे अति सेवन यांमुळे आपल्या आरोग्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. परिणामी, लठ्ठपणा आणि हृदयरोगाचा धोका वाढत आहे. केवळ कर्नाटकातच ४५ तरुणांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. जीवनशैलीतील बदल हे याचे प्रमुख कारण आहे.
देशात लठ्ठपणा सामान्य झाला आहे. भारतात सध्या सुमारे ३५ कोटी लोक लठ्ठपणाने त्रस्त आहेत. तसेच, तेलयुक्त पदार्थांचे सेवन वाढले आहे. एफएसएसएआयने तेल आणि साखरेचे प्रमाण १० टक्क्यांनी कमी करण्याचे आवाहन केले आहे.
मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसारख्या समस्या पूर्वी वृद्धांमध्ये होत्या, त्या आता लहान मुलांपासून तरुणांपर्यंत वाढत आहेत. देशात सुमारे २१ कोटी २० लाख लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. यात युवा वर्गाची संख्या मोठी आहे. बैठी जीवनशैली आणि चुकीचा आहार यामुळे तरुण वयातच अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
शहरातील अरिहंत हॉस्पिटलमध्ये डॉ. एम. डी. दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली हृदय विभाग पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे. त्यांनी केवळ तीन वर्षांत ७ महिन्यांच्या गर्भवती महिलेवर बायपास असो किंवा १० दिवसांच्या बाळावर ओपन हार्ट सर्जरी असो, अशा अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत. यामुळे डॉ. एम. डी. दीक्षित यांच्या हातात हृदय सुरक्षित असते, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.



